लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कल्याणीनगर येथील पार्शे मोटार अपघात प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा, असे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठविले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. पोर्शे मोटार अपघात प्रकरणात पोलिसांसह डॉक्टरांनीही आरोपीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत दोन डॉक्टर, शिपाई यांना अटक करण्यात आली होती.
या अपघातानंतर अल्पवयीन मोटारचालकाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले होते. या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. गेल्या दहा महिन्यांपासून दोघेही डॉक्टर तुरुंगात आहेत. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.
त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव
या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. हे दोन अधिकारी त्यावेळी येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून या दोघांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात दोघेही दोषी आढळले. त्यानुसार त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.