पुणे : महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयातील १५ पैकी १३ डायलिसिस यंत्रे बंद असल्याची बाब आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुढे आली आहे. त्यामुळे केंद्र चालविणाऱ्या संस्थेला नोटीस बजाविण्यात आली असून खुलासा मागविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील गरीब रुग्णांना माफक दरात डायलेसिसची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात आले आहे. सेंटर लायन्स क्लब ऑफ पुना या चॅरिटेबल संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. या संस्थेकडून काही दिवसांपूर्वी केंद्र दीड दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कमला नेहरू रुग्णालयाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी केंद्रामध्ये काही अनियमितताही असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा – रेल्वेकडून शिवाजीनगर, चिंचवडसह पाच वाहनतळांचे चुटकीसरशी लिलाव

संबंधित संस्थेबरोबर २०१६ मध्ये पाच वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ या संस्थेला देण्यात आली होती. सद्यस्थितीत रुग्णालयातील १५ पैकी १३ डायलेसिस यंत्रे बंद आहेत. केंद्रामध्ये परिचारिकाही पुरेशा प्रमाणात कार्यरत नसल्याचे दिसून आले. तसेच वैद्यकीय कचऱ्याचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित संस्थेला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamla nehru hospital 13 dialysis machines shut down condition of patients pune print news ssb