महापालिका रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला चौथ्या शनिवारच्या सुटीचे कारण सांगून दाखल करून घ्यायला नकार देण्याचा प्रकार शनिवारी घडला. त्यामुळे या महिलेला खासगी रुग्णालयात जाऊन प्रसूतिक्रिया पार पाडावी लागली. या प्रकरणी शिवसेनेने जोरदार आंदोलन केल्यानंतर भरती करून घ्यायला नकार देणाऱ्या डॉक्टरांवर सोमवारी कारवाई करण्यात आली.
कमला नेहरू रुग्णालयात ही महिला शनिवारी (२२ फेब्रुवारी) प्रसूतीसाठी गेली होती. मात्र चौथा शनिवार असल्यामुळे सुटीचे कारण देत तिला भरती करून घ्यायला तेथील डॉ. वीणा तोंडकर, डॉ. सपना वर्मा आणि डॉ. संदीप येंडे यांनी नकार दिला. रुग्णालयात सकाळी साडेदहा वाजता ही महिला पोहोचली होती. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास सुटीमुळे आम्ही कोणतेही उपचार करू शकत नाही. तुम्ही सोमवारी या असे त्या महिलेला सांगण्यात आले. असे सांगून त्या महिलेच्या नातेवाईकांची एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली व तिला तेथून जाण्यास सांगण्यात आले. अशा परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडण्यासारखा नसतानाही ती महिला एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झाली.
रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवसैनिकांनी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांना घेराव घातला. त्यानंतर संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. संबंधित महिलेचा खासगी रुग्णालयात झालेला सर्व खर्च महापालिकेने त्वरित द्यावा, अशीही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतन यांनी आरोग्यप्रमुखांना एक पत्र दिले असून रुग्णाला झालेल्या गैरसोयीबद्दलचा खर्च ज्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे त्यांच्या मानधनातून वसूल करावा, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Story img Loader