पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील जानेवारीपासून बंद असणाऱ्या ४ लिफ्ट अखेर गुरुवारी सुरू करण्यात आल्या. जानेवारीत या रुग्णालयातील लिफ्टला अपघात झाल्यानंतर रुग्णालयात केवळ २ लिफ्ट सुरू होत्या. त्यामुळे गेले तीन-साडेतीन महिने रुग्णांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती.  
कमला नेहरू रुग्णालयाच्या जुन्या व नवीन इमारतीत मिळून एकूण ८ लिफ्ट आहेत. यांपैकी ६ लिफ्ट बुधवापर्यंत बंद होत्या. बंद असणाऱ्या लिफ्टपैकी ४ लिफ्ट गुरुवारी सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दुराईराजन भारतन यांनी दिली.
अजूनही रुग्णालयातील २ लिफ्ट बंदच असून त्या लवकरच सुरू होऊ शकतील, असे पालिकेच्या तांत्रिक विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘जानेवारीत रुग्णालयातील लिफ्टला अपघात झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला सर्व लिफ्ट बंद केल्या होत्या. त्यानंतर प्रथम २ लिफ्ट सुरू केल्या व शुक्रवारी आणखी ४ लिफ्ट सुरू केल्या आहेत. सध्या रुग्णालयातील १ आणि  ४ क्रमांकाच्या लिफ्ट चालू स्थितीत नाहीत. ४ क्रमांकाच्या लिफ्टच्या देखभालीचे काम पंधरा दिवसांपासून सुरू असून अजून दहा दिवसांनी ती सुरू होऊ शकेल. त्यानंतर आम्ही क्रमांक १ ची लिफ्ट सुरू करू. आता लिफ्टसाठी काही सुरक्षा मानके बंधनकारक करण्यात आली आहेत. त्या सर्वाचा समावेश दुरुस्तीदरम्यान लिफ्टमध्ये करण्यात येत आहे.’’
पालिकेच्या सर्वच इमारतींमधील लिफ्टचे ‘सेफ्टी ऑडिट’ केले जात असून लिफ्ट निरीक्षकाने सुचवलेल्या सुधारणा करून घेतल्या जात असून. या कामासाठी चालू वर्षी १ कोटी रुपयांची तरतूद आहे, असेही दहिभाते यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा