पुढील महिन्यात कन्हैया कुमारची पुण्यात जाहीर सभा होणार असल्याचे ‘ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन’ने सोमवारी जाहीर केले. सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पुण्यासोबतच राज्यातील मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती येथेही कन्हैया कुमारच्या सभा होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
‘कन्हैया कुमारला पुण्यात बोलावणारच,’ अशी घोषणा पुण्यातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विचार मंचाने रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. फिल्म इन्स्टिटय़ूट, रानडे इन्स्टिटय़ूट आणि फर्ग्युसन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संयुक्त विचार मंचाची स्थापना केली आहे. कन्हैया कुमारचा कार्यक्रम शिक्षणसंस्थेत करण्यासाठी विद्यापीठाने परवानगी नाकारल्यास सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यात येईल, असेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेकडून एप्रिलमध्ये पुण्यात सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.
फर्ग्युसन महाविद्यालय आणि रानडे इन्स्टिटय़ूटप्रमाणेच मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणीही कन्हैया कुमारला संवादासाठी बोलावण्यात आले आहे. कन्हैया कुमारची पुण्यात सभा घेतल्यास आयोजकांना फोडून काढू, अशी धमकी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुण्यातील एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी संंबंधित विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.
एप्रिलमध्ये कन्हैयाची पुण्यात सभा, ‘ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन’ची माहिती
मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती येथेही होणार सभा
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 28-03-2016 at 18:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar will hold public rally in pune in april says aisf