कर्नाटकमधील हिजाब घालण्याच्या वादावरून सध्या देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. उडुपीमधील एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून देशभर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. देशाच्या संसदेत देखील या मुद्द्याचे पडसाद उमटल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
“प्रत्येकाने कोणता वेश परिधान करायचा याचा अधिकार भारतीय घटनेने दिला आहे. याबाबत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे. शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण जे पूर्वीपासून चालू आहे त्यामध्ये व्यत्यय आणून वेगळी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकात होत आहे. त्या शाळेत पूर्वी ते चालू होते पण ते आता थांबण्यासाठी मुद्दाम हा विषय तयार करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारच्या अपयशांकडून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न आहे,” असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.
Hijab Row : मुंबईतल्या ‘त्या’ महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी?; प्राचार्यांनी दिले स्पष्टीकरण
दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शाळांमध्ये गणवेश आवश्यक आहे असे म्हटले आहे. “शाळा/महाविद्यालयांमध्ये विहित गणवेश असेल तर त्याचे पालन केलेच पाहिजे. शैक्षणिक संस्थामध्ये केवळ शिक्षणावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. शाळा/महाविद्यालयांमध्ये धार्मिक किंवा राजकीय विषय आणू नयेत. चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळायला हवं,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी हिजाबच्या समर्थनासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. याबाबात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Hijab Row : “गणवेश असेल तर त्याचे..”; हिजाब घालण्याच्या वादावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
“परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका”, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं. “जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं”, असं वळसे पाटील म्हणाले.