काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी, पक्षाला नवी दिशा देण्याकरता काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली देशभर भारत जोडो यात्रा काढली होती. देशातील विविध स्तरांतून या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा संपल्यानंतर कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेस जिंकू शकली, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.ते पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे पत्रकारांशी बोलत होते.

“राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे”, असं शरद पवार म्हणाले.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू केली होती. जानेवारी महिन्यात ही यात्रा थांबली. पाच महिन्याच्या काळात राहुल गांधी यांनी चार हजार किमीची पदयात्रा केली. यावेळी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला.

हेही वाचा >> “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

जागावाटपाबाबत काय म्हणाले शरद पवार?

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे. यामध्ये काही लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्वतंत्र लढावे, इतरांनी स्वतंत्र लढावे मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोटबंदीवरही टीका

दोन हजाराच्या नोटीसंदर्भात एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. यापूर्वीही अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने प्रचंड लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधी रक्कम होती जी बदलून दिली नाही. त्यातून बँकेचे आर्थिक नुकसान झाले. निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्या जास्त गुंतवणूक आहे त्यांना बदल करून द्यायची जबाबदारी पाळायची नाही आणि आम्ही काही वेगळे करतोय असे दाखवायचे. त्यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने देशात चमत्कार केवळ इतकाच झाला की अनेकांनी आत्महत्या केला. अनेक कुटुंब, अनेक व्यावसायिक हे उद्धवस्त झाले. तो चमत्कार पुरेसा नाही म्हणून हा दुसरा चमत्कार केला आहे.