कर्वेनगरमधील घरे नियमित करण्यासंबंधीचा प्रस्ताव अखेर राज्य शासनाने मान्य केला असून त्यासंबंधीचा निर्णय शुक्रवारी मंत्रालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घरे नियमित करण्यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून १९९५ पूर्वीची घरे नियमित करण्याची प्रक्रिया आता कायद्यातील तरतुदींनुसार सुरू होणार आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हिंगणे गावात साथीचा रोग पसरल्यामुळे हिंगणे येथील ग्रामस्थांचे स्थलांतर कर्वेनगर येथे करण्यात आले होते. सुमारे सत्तर वर्षांपूर्वीची ही घटना आहे. ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी राज्य शासनाने ३६ एकर जागा ताब्यात घेतली होती आणि त्यातील काही भूखंडांचे वाटप शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र, स्थलांतरित झालेल्या सर्व कुटुंबांना जागा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. ही प्रक्रिया अनेक वर्षे रखडली. दरम्यानच्या काळात तेथील कुटुंबांची संख्या व घरे वाढत गेली. त्यानंतर अनेक वर्षे मागणी करूनही तेथील घरे नियमित करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती.
स्थानिक आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी गेली चार वर्षे या विषयाचा पाठपुरावा केला होता. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख, संदेश शिर्के यांनीही घरे नियमित करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करणे, मोजणी वगैरे बाबी पूर्ण केल्या होत्या. या प्रस्तावासंबंधी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. आमदार मोकाटे, आमदार गिरीश बापट, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड तसेच कोथरूड मतदारसंघातील काँग्रेसचे व शिवसेनेचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. कर्वेनगरातील १९९५ पूर्वीची बांधकामे नियमान्वित करावीत असा निर्णय थोरात यांनी यावेळी घेतला. तसेच १ जानेवारी १९९५ नंतरच्या बांधकामांची प्रकरणे तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करावा, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
गेली अनेक वर्षांची मागणी महसूलमंत्री थोरात यांनी मान्य केल्यामुळे हा प्रश्न आता सुटला आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या वतीने थोरात यांचे अभिनंदन, असे अभय छाजेड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला
कर्वेनगरमध्ये स्थलांतर झालेल्यांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच हा निर्णय होऊ शकला. घरे नियमित होण्यासाठी मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले याचा मला निश्चितच आनंद आहे.
                                                                                आमदार चंद्रकांत मोकाटे

Story img Loader