‘कसाब आणि मी’ नाटकाचा रविवारी शुभारंभाचा प्रयोग

भरधाव वेगाने एसटी आणि मोटार चालवून लोकांना चिरडून टाकणे असो किंवा दुचाकी आणि चारचाकी गाडय़ा जाळण्याचे सत्र असो; माथेफिरू मनोवृत्तीतून तरुणाईच्या हातून घडणाऱ्या अशा घटनांवर नाटकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अवघ्या २७ वर्षांच्या अधीश पायगुडे या तरुण रंगकर्मीने ‘कसाब आणि मी’ हे नाटक लिहिण्याचे शिवधनुष्य पेलले असून रविवारी (२२ मे) ज्योत्स्ना भोळे नाटय़गृह येथे सायंकाळी सात वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

कसाब म्हटल्यावर मुंबईवरील २६-११ चा दहशतवादी हल्ला आठवतो. कसाब हा पाकिस्तानी आणि जिहादी होता. पण, आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना माथेफिरू मनोवृत्तीतून घडताना दिसतात. या घटनांवर कसाब या रूपकाच्या माध्यमातून प्रकाश टाकत वेध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे अधीश पायगुडे याने सांगितले. एखाद्या बाळंतपणासारखीच नाटक लिहिण्याची प्रक्रिया नऊ महिन्यांत पूर्णत्वास गेली असली, तरी हा विषय दोन वर्षांपासून माझ्यामध्ये जणू घुमला होता. अनेकांशी चर्चा केल्यानंतर आणि प्रारंभीचे लेखन दाखविल्यानंतर हे नाटक होऊ शकते असे मला प्रोत्साहन मिळाले. मूळ मुद्दा प्रभावीपणे पोहोचतोय हे ध्यानात आल्यानंतर लेखन पूर्ण केले. पूर्वी एका नाटकाच्या निमित्ताने दीपक करंजीकर यांच्याशी परिचय झाला. त्यांनी नाटकाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा प्रदर्शित केली हे माझ्यासाठी भाग्याचे ठरले. या नाटकामध्ये दीपक करंजीकर, विद्या करंजीकर आणि मी अशा तिघांच्या भूमिका आहेत, असेही अधीशने सांगितले.

पीटर श्ॉफर यांचे ‘इक्यूस’ हे नाटक वाचनात आले आणि त्यातून मला कथाबीज सापडले. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी मला लेखनासाठी आत्मविश्वास दिला. किरण यज्ञोपवीत, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी यांनी लेखन उत्तम झाले असल्याची पावती दिली. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत चांदोरकर यांनी लेखनामध्ये नाटकातील व्यक्तिरेखांची मानसिकता या विषयासाठी मदत केली. सणक आली म्हणून वेडाच्या भरात काही कृत्ये करणाऱ्या तरुण वयातील मुलांची ही कथा आहे. माथेफिरूपणा किती विकोपाला जात असेल याचा विचार करताना फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप ही माध्यमे आपण विवेकीपणाने हाताळत आहोत का, या मुद्दय़ाकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तपत्रातील दररोजच्या बातम्या वाचताना माथेफिरूपणाच्या घटनांनी मी अस्वस्थ होत होतो. हा अस्वस्थपणाचा नाटय़लेखनातून अभिव्यक्त झाला आहे. प्रेक्षक अस्वस्थ होतील आणि अंतर्मुख होऊन विचार करू लागतील, अशी अपेक्षा असल्याचे अधीश पायगुडे याने सांगितले.

Story img Loader