कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज ( २६ फेब्रुवारी ) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली आहे. रवींद्र धंगेकर यांनी रविवारी पेठेतील मनपा शाळा क्रमांक ९ मध्ये मतदान केलं आहे.
यावेळी मतदानासाठी आलेल्या मतदार नेमावती नवलखा यांनी भाजपावर सडकून टीका केली. “राहुल गांधी येडा, गबाळा पप्पू बरा. पण, गतिमान विकास आणि अतिशहाने तर नकोच. राहुल गांधींसह त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला त्याग कोणीच विसरता कामा नये. आम्हाला आमचा शनिवारवाडा, लाल महाल विकला नाही पाहिजे. भिडेवाड्याची विल्हेवाट लावली नाही गेली पाहिजे. अदानी ग्रुपला पाच एअर पोर्ट विकले गेले. त्याप्रमाणे आपला शनिवारवाडा देखील विकला जाईल. या सर्व गोष्टी वाचविण्यासाठी मी मतदान करण्यासाठी आली असून या मतदार संघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं.
हेही वाचा : कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात; सनईच्या स्वरात आणि रांगोळ्यांनी मतदारांचं स्वागत
“आपल्या शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील प्रामुख्याने प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाणी कपात या दोन्ही समस्या लवकरात लवकर सुटल्या पाहिजे. तसेच मेट्रोची वीस वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, त्यावेळी याच लोकांनी खोडा घालून रेंगाळत ठेवली आहे. पण, आता मेट्रो सुरू करीत असून, त्याचा काही उपयोग होणार नाही. सध्याचा काळ लक्षात घेता आपल्या नागरिकांना हेलिकॉप्टरची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया नवलखा यांनी व्यक्त केली.