पुणे : कसबा विधानसभा मतदरासंघात पाणीपुरवठ्यापासून पदपथांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वाहनतळाचा अभाव आणि स्वच्छतागृहांची दुरुस्तीही झालेली नाही, अशा अनेक तक्रारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांकडे केल्या. मतदारसंघातील प्रभागनिहाय समस्यांची यादी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना देत नागरी समस्या तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपाच्या वतीने कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत नागरिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून, त्या संदर्भात हेमंत रासने यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची सोमवारी भेट घेतली. त्या वेळी प्रलंबित प्रश्नांबाबतचे निवेदन त्यांनी दिले. कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे, डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – पुणे : ‘पीएमपी’च्या प्रवासी दिनात तक्रारींचा पाऊस
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पार्किंगचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. तसेच पार्किंगच्या पट्ट्याही अस्पष्ट आहेत, याकडेही रासने यांनी लक्ष वेधले. बहुतांश पदपथांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तसेच पदपथ नादुरुस्त झालेले आहेत. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा अस्पष्ट झाल्या आहेत. सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांची साफसफाईची कामे झालेली नाहीत. वस्ती विभाग आणि जुन्या वाड्यांच्या परिसरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था असून, नियमितपणे साफसफाई होत नाही. धोकादायक पद्धतीने वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली नाही. पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची बाब रासने यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.