पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आज रात्री कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्याचदरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भेट घेतली.
भेटीनंतर रविंद्र धंगेकर म्हणाले की, “मागील तीस वर्षांपासून राजकीय जीवनात असून कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मला उमेदवारी दिल्यास तेथूनच कसबा मतदारसंघात विजयाची नांदी सुरू होईल,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ, ४० जणांविरोधात गुन्हा
तुम्ही शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर धंगेकर म्हणाले की, आम्ही नेहमी पवार साहेबांची भेट घेत असतो. त्यांचे आशिर्वाद घेत असतो. तसेच माझे आजोळ आणि घर बारामतीमध्ये असल्यामुळे तो आमच्या परिवारातील विषय असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. तसेच इच्छुकदेखील अधिक असून तुम्हाला उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करणार का? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अपक्ष निवडणूक लढविणे सोपे नाही. पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असणार.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार कसबा पेठ विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल, तर चिंचवडच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते भूमिका मांडतील, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणtक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.