Kasba Chinchwad Bypoll Election 2023: कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा मोठा पराभव होऊन त्याठिकाणी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. यानंतर या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “भाजपाचा पराभव हा खरोखर खूपच धक्कादायक आहे. हा पराभव पचवणं खूप अवघड आहे. गेली ३०-३५ वर्ष भाजपाची याठिकाणी घट्ट बांधणी होती. या पराभवाची कारणे शोधून काढणे, पुढच्या काळात महत्त्वाचे ठरेल.” टिळक कुटुंबातील एखाद्याला तिकीट मिळाले असते तर पराभव टाळता आला असता का? अशा प्रश्न विचारला असता शैलेश टिळक म्हणाले की, नागरिकांपर्यंत पोहोचून या कारणांचा शोध घ्यावा लागेल.
आम्हाला प्रभाग १५ मधून जेवढे मताधिक्य मिळणे अपेक्षित होते, तेवढे मिळाले नाही. अजून अधिकृत आकडेवारी आलेली नाही. आम्हीही टीव्हीवर दिसत असलेल्या आकड्यांमधून अंदाज बाधत आहोत. पण जनतेमधून नक्की काय नाराजी होती? हे पाहावे लागेल. आजपर्यंत झालेली विकासकामे किंवा नगरसेवकांनी केलेल्या कामाबाबत काही नाराजी आहे का, हेही तपासून पाहिले पाहीजे. या पराभवाला ब्राह्मण समाजाची नाराजी कारणीभूत आहे का? या प्रश्नावर शैलेश टिळक म्हणाले की, आकडेवारी हाती आल्यावर भाष्य करता येऊ शकेल. तसेच मला जी मतदार यादी दिली होती, त्यावर मी चोख काम केले आहे. प्रचारात मी कुठेही कमी पडलो नाही.
हे वाचा >> कसब्यात परिवर्तन, भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
तसेच मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक म्हणाले की, जर तरच्या प्रश्नाला आता काही अर्थ नाही. ११ हजारांच्या मताधिक्याने रवींद्र धंगेकर जर निवडून येत असतील तर ते का आले? कुठल्या बुथवर मतदान कमी पडले. कुठल्या प्रभागात मतदान झाले नाही? याचा अभ्यास आणि विश्लेषण करणे गरजेचे आहे.