निवडणुकांच्या दरम्यान सर्वाधिक उत्साहात असतात ते नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण करुन पहिल्यांदाच मताधिकार बजावण्याची संधी असलेले नवमतदार. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अशी संधी मिळालेल्या नवमतदारांनी आज ( २६ फेब्रुवारी ) मताधिकार बजावला आहे.
कुणाल मुंदडा आणि अनिकेत थोरवे या नवमतदारांनी आज पहिल्यांदाच मतदान केलं. अहिल्यादेवी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करायला मिळेल म्हणून वयाची १८ वर्ष पूर्ण होताच मतदार ओळखपत्राची प्रक्रिया पूर्ण केली. पण, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदान करायची संधी मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : रूपाली ठोंबरेंच्या फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो पोस्ट! रुपालीताई म्हणतात “मी मतदान…”
कुणाल मुंदडा म्हणाला, “१८ वर्षांनंतर मतदान करण्याची संधी मिळते. घरातील सगळेजण प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदान करतात. यंदा महापालिकेची निवडणूक होईल तेव्हा मलाही मतदान करता येणार याचा आनंद आणि उत्साह होता. ती निवडणूक लांबल्यामुळे काहीसा हिरमोड झाला. मात्र, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शाळा-कॅालेजच्या अभ्यासात शिकलेली निवडणुक प्रक्रिया अनुभवायला मिळाली याचा आनंद वाटला,” असेही कुणालने सांगितलं.
हेही वाचा : कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…”
“निवडणूक जाहीर होताच मतदार यादीत नाव तपासले. मतदानासाठी लागणारी स्लीपही घरपोच आली होती, त्यामुळे मतदान करणे सोपे झालं,” असे अनिकेत थोरवे याने म्हटलं आहे.