पुणे : पोटनिवडणूक मतदान तोंडावर आले असल्याने कारवाईला वेग आला आहे. कसब्यात भरारी पथकाकडून साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अमली पदार्थ, अवैध मद्य जप्तीच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत ४३ लाख रुपये, तर कसब्यात यापूर्वी पाच लाख तीन हजार ५००, तर मंगळवारी साडेपाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख ५३ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही साडेपाच लाख रुपयांची रोकड स्वारगेट येथे भरारी पथकाने चारचाकीची तपासणी करून रोकड जप्त केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा >>> पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण, कसब्यात भाजपचे हेमंत रासने, तर चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे नाना काटेंकडून सर्वाधिक खर्च

चिंचवडमध्ये ७३३६.१६ लिटर, तर कसब्यात ३१३.१८० लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अनुक्रमे चार लाख ९७ हजार ६२५ आणि २० हजार ६५० रुपये आहे. चिंचवडमध्ये ९४ हजार ७५० रुपये किंमतीचे ३.५८४ ग्रॅम, तर पाच लाख रुपयांचे २५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, कसब्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सेंट्रल आर्मडड् पोलीस फोर्स – सीएपीएफ) पाच तुकड्या, पोलीस १५००, तर चिंचवडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स – सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स – सीआयएसएफ) आणि आयटीबीपीची प्रत्येकी एक तुकडी तैनात असेल.

हेही वाचा >>> कसबा पेठ मतदार संघात आतापर्यंत दहा हजार वाहनांची तपासणी

शीघ्र कृती दलाच्या (आरपीएफ) दोन तुकड्या, पोलीस ८३६, तर गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) १६९ कर्मचारी तैनात असणार आहेत. कसब्यात नऊ, तर चिंचवडमध्ये १३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. कसब्यातील २७, तर चिंचवडमधील ५१ मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चिंचवडमध्ये १२ भरारी पथके, अवैध रोकड तपासणारी सात पथके, चित्रीकरण करणारी सहा, चित्रीकरण पाहणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे. कसब्यात भरारी आणि अवैध रोकड तपासणारी प्रत्येकी नऊ पथके, चित्रीकरण करणारी दोन, चित्रीकरण तपासणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba election police action five and a half lakhs cash has been seized pune print news psg 17 ysh
Show comments