पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पर्वती – माधुरी मिसाळ, कोथरूड-चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला – भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी – सुनील टिंगरे आणि हडपसर – चेतन तुपे या विद्यमान आमदारांची महायुतीमध्ये उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक या तिघांनी मतदार संघातून तयारी सुरू केली होती.या तिघांपैकी एकाला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा : ‘कसब्या’त पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने

मात्र पुन्हा एकदा भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवित कसबा मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यामुळे आता भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि मनसेचे गणेश भोकरे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराज होऊन सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय…’ ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.आता धीरज घाटे यांची नाराजी पक्षातील वरीष्ठ नेतेमंडळी कशा प्रकारे दूर करतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.