Kasba Peth by-election कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर झाला नाही. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत तेथील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पुण्यात बैठक घेत आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आज बैठक आयोजित केली आहे. या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. आघाडी मधील कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवयाची याबाबत वरीष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि तो निर्णय सर्वांना मान्य असणार असल्याचं त्यांनी सांगितले. कसबा विधान सभेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाला जागेबाबत बोलण्याचा अधिकार आहे. पण सर्व पक्षाचे वरीष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल अशी भूमिका त्यांनी मांडली.