नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. धंगेकरांच्या या विजयाकडे सत्ताधारी भाजपासमोरचं मोठं आव्हान म्हणूनच पाहिलं गेलं. त्यांच्या विजयाच्या चर्चा आत्ता कुठे शांत होत असतानाच रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे. अजित पवारांच्या विधानाविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी “मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, असं उत्तर दिल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री व्हायचंय?

सोलापूरमध्ये बोलताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी “मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल” असं विधान केलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “काल काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो होतो. तिथे सगळे पत्रकार बसले होते. अजित पवारांच्या सध्याच्या चाललेल्या हालचालींबाबत मला प्रश्न विचारण्यात आला. मी म्हणालो अजित पवार आमचे नेते आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यांना काय, मलाही मुख्यमंत्री व्हायचंय. सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री व्हायचंय. या पलीकडे मी काही बोललो नाही”.

खासदार व्हायला आवडेल का?

दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी रवींद्र धंगेकरांचा विचार होत असल्याची चर्चा सध्या चालू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीचे नेते यावर निर्णय घेतील. हा विषय माझा नाही. पक्षानं जो उमेदवार दिला, त्याला निवडून आणण्याचं काम मला करावं लागेल”, असं ते म्हणाले.

“चंद्रकांत पाटील तर पाहुणे, निवडणुकीच्या आधी…”

भाजपाच पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांना धंगेकरांनी यावेळी टोला लगावला. “चंद्रकांत पाटील पाहुणे आहेत. ते या निवडणुकीच्या आधी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहेत. त्यांची काही पुण्याशी नाळ नाहीये. पाहुण्या मंडळींना किती दिवस आपल्या घरी ठेवायचं हे पुणेकरांनीही ठरवलंय आणि भाजपाच्या लोकांनीही ठरवलं आहे”, असं ते म्हणाले.

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांचं मिश्किल विधान; म्हणाले, “मलाही…”

“भाजपाच्या काही लोकांना ते आवडत नाहीत. माझ्यासहीत भाजपाचे अनेक लोक त्यांना इथून पाठवायला तयार आहेत. त्यांचा पुण्याशी काहीही संबंध नाही. दोन वर्षांत येणार आणि पुण्याचं नेतृत्व करणार. पुण्यातली लोकं, पुण्यातले नेते काही एवढे षंढ नाहीत. ते वरून आलेलं नेतृत्व आहे. किती दिवस चालवायचं हे पुणेकर ठरवतील”, असंही धंगेकरांनी यावेळी नमूद केलं.

“शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर राग असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले. “मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटलेच नाही. त्यांचा माझ्यावर भरपूर राग आहे. कारण त्यांनी एवढे पैसे वगैरे वाटूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुणेकरांनी त्यांना माघारी पाठवलं. त्याचा राग त्यांच्या मनात आहे. राजकारणात पराभव सहन करणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. त्या पराभवातून ते अजून बाहेर पडलेले नाहीत”, असं धंगेकर म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba peth mla ravindra dhangekar mocks eknath shinde devendra fadnavis pmw
Show comments