प्रभागाचे प्रगतिपुस्तक

कसबा पेठ-सोमवार पेठ

प्रभाग क्रमांक १६

नगरसेवक

* पल्लवी जावळे * रवींद्र धंगेकर

* सुजाता शेट्टी * योगेश समेळ

विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : कसबा पेठ येथील जुन्या वाडय़ांचे बांधकाम करण्याचा प्रश्न असो किंवा अरुंद रस्त्यांमुळे नित्याची होणारी वाहतूक कोंडी या प्रश्नांमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक त्रस्त आहेत. कमला नेहरू रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असले, तरी डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांच्या कमतरतेमुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. चार नगरसेवक असले तरी त्यांची तोंडे चार दिशांना असल्यामुळे एकत्रित विकासाचे धोरण राबविले जात नाही, अशी या प्रभागातील मतदारांची व्यथा आहे.

कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागामध्ये बारा बलुतेदारांसह मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य आहे. तांबट, भोई आणि कुंभार समाजातील नागरिकांसह मुस्लीम लोकवस्ती असलेला कागदीपुरा परिसर याच प्रभागामध्ये येतो. शहरातील कसबा पेठेमध्ये जुन्या वाडय़ांचे प्रश्न प्रलंबित आहेत. जुन्या पुण्याचा भाग असलेल्या कसब्यातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही पाचवीला पुजली गेली आहे. आधीच अरुंद रस्ते, दाटीवाटीची लोकवस्ती आणि वाहनांची वाढती संख्या याचा परिणाम म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. काही रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले, तरी दाटीवाटीची लोकसंख्या आणि वाहनाची वाढती संख्या ध्यानात घेता वाहतुकीची कोंडी अटळ आहे. त्यातच साततोटी चौकामध्ये मेट्रो स्टेशन होत आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असते. फडके हौद चौक, आर. सी. एम. गुजराती शाळा हा भाग वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. पल्लवी जावळे या शिवसेनेच्या नगरसेविका, रवींद्र धंगेकर आणि सुजाता शेट्टी हे दोन काँग्रेसचे नगरसेवक तर योगेश समेळ हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.

तांबट, भोई आणि कुंभार समाज या प्रभागामध्ये मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास आहे. या समाजातील काही लोक उपनगरामध्ये वास्तव्यास गेले असले, तरी बहुतांश लोकांची घरे प्रभागामध्ये आहेत. या समाजाच्या मागण्यांकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत, अशी या समाजातील नागरिकांची कैफियत आहे.

कमला नेहरू रुग्णालय हे या प्रभागातील प्रमुख वैद्यकीय केंद्र सातत्याने वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे चर्चेमध्ये असते. पूर्वी प्रसूतिगृह असलेल्या या रुग्णालयाचे आधुनिकीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता रुग्णालय आधुनिक झाले असले, तरी डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे येथील वैद्यकीय सेवा रुग्णांसाठी अडसर निर्माण करणारी ठरते, अशी व्यथा प्रभागातील नागरिकांनी मांडली. या प्रभागामध्ये एकही वाहनतळ नाही. आता चारचाकी घेतली तरी ती रस्त्यावरच लावावी लागते. परिणामी रस्त्यावर लावलेल्या या गाडय़ांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे वाहने लावण्यासाठी प्रभागामध्ये एखादे वाहनतळ करण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण नागरिकांनी नोंदविले.

कसबा पेठेतील जुन्या वाडय़ांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अनेक जुने वाडे मोडकळीस आले आहेत. मात्र, प्रभागालगत असलेल्या शनिवारवाडा या अ श्रेणीच्या वारसा स्थळामुळे शंभर मीटर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे अनेक जुन्या वाडय़ांचे पुनर्निर्माण रखडले आहे. उपलब्ध जागेमध्ये नवीन बांधकाम विकसकाला आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने अनेक जुन्या वाडय़ांचे प्रश्न प्रलंबितच आहेत, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारून मुलांना या शाळेकडे आकृष्ट करण्याची गरज असल्याचे मत जागरूक मतदारांनी व्यक्त केले.

नगरसेवकांचे दावे

* शनिवारवाडय़ालगतच्या कसब्यातील जुन्या वाडय़ांच्या विकासाचे प्रश्न प्रलंबित

* अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याखेरीज वाहतूक कोंडी सुटणे अशक्य

* सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी उपाययोजनांची कार्यवाही सुरू

* विरोधक असल्याने विकासकामांना दिला जाणारा निधी अपुरा

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

कसबा गणपती मंदिर, त्वष्टा कासार मंदिर, आर. सी. एम. गुजराथी हायस्कूल, त्रिशुंडय़ा गणपती मंदिर, नागेश्वर मंदिर, गावकोस मारुती मंदिर, खडीचे मैदान, मंगळवार पेठ, कडबा कुट्टी, कमला नेहरू रुग्णालय, भीमनगर, माहेश्वरी बालाजी मंदिर, कागदीपुरा

नागरिक म्हणतात

चार नगरसेवक असले तरी चौघांची तोंडे चार दिशांना आहेत. एक स्वीकृत नगरसेवक महापालिका गटनेते झाले आहेत. पण, प्रभागामध्ये विकासकामे झालेली दिसत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे अशी धारणा असलेले प्रभागातील मध्यमवर्गीय नागरिक सहसा राजकीय नेत्यांच्या पाठीमागे जात नाहीत. प्रत्येक नगरसेवकाने भाग वाटून घेतले असल्यामुळे प्रश्न असेल तर जायचे कोणाकडे हा प्रश्न नागरिकांना भेडसावतो.

– जितेंद्र कदम, १५ ऑगस्ट चौकाजवळ, सोमवार पेठ

प्रभागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा ही मोठी समस्या आहे. एका सोसायटीमध्ये विजेची मोटार लावून पाणी उपसणे सुरू झाल्यानंतर पुढच्या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होतो. प्रत्येक नगरसेवकाचे ठेकेदार ठरलेले असतात. त्या ठेकादारांवर अधिकारी कारवाई करू शकत नाहीत. प्रभागामध्ये बेकायदा बांधकामे सुरू असून त्यांना नगरसेवकांचे अभय असल्याचे दिसून येते.

– सतीश लोखंडे, कसबा पेठ

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

चारपैकी केवळ एकच नगरसेवक सत्ताधारी भाजपचा असल्यामुळे त्याला विकासकामांसाठी निधी उपलब्ध होतो. विरोधी पक्षांच्या तीन नगरसेवकांना निधीच मिळत नसल्याने मतदारांच्या अपेक्षांची पूर्ती करता येत नाही.   भाजपच्या नगरसेवकाची पहिली दोन वर्षे कामे दिसली.  तांबट, भोई, कुंभार अशा समाजांना बरोबर घेऊन रचनात्मक विकासकामे होताना दिसत नाहीत.

– गणेश नलावडे, राष्ट्रवादी

‘सर्वाची जबाबदारी म्हणजे कोणाचीच जबाबदारी नाही’ या उक्तीनुसार या प्रभागामध्ये चारही नगरसेवकांचे कामकाज चालते. अपुऱ्या दाबाने होणारा पाणीपुरवठा, कचरा आणि पार्किंग या तीनच प्रमुख समस्या आहेत. कृत्रिमरित्या अपुऱ्या दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठय़ास एक नगरसेवक जबाबदार आहे. लोकांनी आपल्याकडेच आले पाहिजे या मानसिकेततून संबंधित नगरसेवकाने यंत्रणा हाताशी धरली आहे.

-अ‍ॅड. नितीन परतानी, काँग्रेस</p>

लोकप्रतिनिधी म्हणतात

अपोलो चित्रपटगृहाजवळील जीवा महाले चौकामध्ये जीवा महाले यांच्या कार्याची माहिती देणारे शिल्प तसेच रास्ते वाडा चौकामध्ये नेत्रदान जागृती घडविण्यासाठी नेत्रदान शिल्प साकारण्यात आले आहे. कमला नेहरू रुग्णालयामध्ये चांगल्या वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती केली जावी, यासाठी महापालिकेमध्ये सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांना अल्प दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डायलेसिस केंद्र सुरू केले गेले. मी विरोधी पक्षाची असल्याने विकासनिधी कमी दिला जातो.

– पल्लवी जावळे, नगरसेविका

महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्षाचा नगरसेवक असल्यामुळे विकासकामांसाठी मला निधी दिला जात नाही. जो काही निधी उपलब्ध झाला त्यातून जलवाहिनी आणि मैलापाणीवाहिनी बदलण्याची कामे करता आली. कमला नेहरू रुग्णालयाचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बाजारीकरण केले आहे. रुग्णालयातील बरेचसे विभाग खासगी लोकांना चालविण्यासाठी दिले असल्याने गरजू रुग्णांना माफक दरात उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.

– रवींद्र धंगेकर, नगरसेवक

शहराच्या पूर्व भागातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यात आली असून हा विभाग लवकरच सुरू होईल. मागेल त्याला नळजोड देण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियम भागातील मैलापाणीवाहिनी नाल्यााला नेण्याचे काम लवकरच सुरू होत असून सदाआनंदनगर भागाचा विकास करण्यात आला आहे.

सुजाता शेट्टी, नगरसेविका

जुन्या पुण्याचा भाग असल्याने पाणीपुरवठा आणि जलवाहिनी बदलणे अशी कामे करण्यावर भर दिला. कमला नेहरू रुग्णालयामध्ये हृदय शस्त्रक्रियेसाठी विकास निधीतून अडीच कोटी रुपयांचे साहित्य देण्यात आले. जुन्या बाजारातील व्यावसायिकांचे पुनर्वसनासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रभागातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते .

– योगेश समेळ, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

* जुन्या वाडय़ांच्या विकासाचे प्रश्न अनिर्णित अवस्थेमध्ये

* प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या

* कमला नेहरू रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा

* अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी