पिंपरी: कष्टकरी जनता आघाडी आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने ‘मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वारकऱ्यांना आरोग्य, मोफत रिक्षा, चप्पल, बूट दुरुस्ती आदींसह १८ प्रकारच्या विविध सेवा संघटनेकडून दिल्या जाणार आहेत. निगडी ते पंढरपूर यामार्गापर्यंत देण्यात येणाऱ्या सेवेचा प्रारंभ मंगळवारी (२१जून) निगडीपासून सुरु करण्यात येणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. आषाढी वारीत देशभरातील अनेक वारकरी पंढरीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था काम करतात. अनेक कष्टकऱ्यांना थेट पंढरपूरपर्यंत जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्यातच विठ्ठलाचे दर्शन होते, अशी कष्टकऱ्यांची भावना आहे. त्यामुळेच आषाढी वारीत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
मंगळवारी (२१ जून) सायंकाळी ४ वाजता निगडी लोकमान्य टिळकात मोफत रिक्षा सेवेद्वारे या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. अपंग, वयोवृद्ध, आजारी, दिंडीतील वारकरी भक्तांसाठी ही सेवा देण्यात येणार आहे. तसेच, छत्री, बॅग दुरुस्ती व बूट, चप्पल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अन्न, धान्य, फळवाटप, दिंडी चालक मालकांसाठी फळे व भाजी पुरवठा करण्यात येणार आहे. २२ जूनला सकाळी ६ वाजता खराळवाडी येथे मोबाईल चार्जिंग स्टेशन, तज्ञ डॉक्टरांच्या टीम सोबत प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र, केशकर्तनालय व मालिशची सेवा सुविधा देण्यात येणार आहे. खडकीत भावगीत, कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २३ जूनला रोजी देवाजी बाबा मंदिर पुणे येथे तर २४ जूनला हडपसर गाडीतळ पासून पंढपूरपर्यंत सेवा देणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.