पुणे : वाहतूक पोलिसांच्या चांगल्या नियोजनामुळे कात्रज चौक बुधवारी कोंडीमुक्त राहिला. चौकात उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने तेथे वाहने येण्याआधीच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यासाठी या मार्गांवर जवळपास ५२ ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे (सेगमेंटल लाॅन्चिंग) काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. बदलाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. बुधवारी मात्र वाहतूक पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण आणले. त्यासाठी पर्यायी मार्गांच्या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करून वाहने चौकाकडे येण्यापूर्वीच योग्य दिशेने मार्गस्थ केल्याने, मुख्य चौकातून सुरू असणारी दैनंदिन वाहतूक सुरळीत राहिली. अवजड वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांची (सिग्नल) यंत्रणा बंद करून चक्राकार पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली. नागरिकांना दूरपर्यंत जाऊन वळसा घ्यावा लागत असल्याने थोडा ताण पडत असला, तरी वाहतूक कोंडीत अडकण्याचा त्रास कमी झाल्याचे चित्र दिसले.
हेही वाचा…सरकारी काम? फक्त एक क्लिक थांब!… फायलींचा प्रवास होणार सोपा
जड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. कात्रज चौकातून जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, त्यांना पर्यायी मार्ग खुले करून दिले आहेत. ही वाहने चौकापर्यंत येऊच नयेत म्हणून मंतरवाडी, हांडेवाडी, नवले पूल, दरी पूल, इस्काॅन मंदिर, गुजरवाडी फाटा, बोपदेव घाट, खडी मशिन चौक, भाजी मंडई थांबा आणि कात्रज घाट अशा ५२ ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करून जड वाहनांना पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आले.
मालवाहू ट्रक टप्प्याटप्प्याने मार्गस्थ
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिलेले असताना मंगळवारी मालवाहतूक करणारी जड वाहने (ट्रक, कंटेनर) जागेवरच थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे नवले पूल, उंड्री पिसोळी या मार्गांवरील रस्त्यांच्या कडेला या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक जड वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने ही वाहने रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक खुली करून टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…कोरेगाव भीमा राष्ट्रीय स्मारकाचे काम कोणी रखडवले?
असे आहे वाहतूक पोलिसांचे नियोजन
पर्यायी मार्गांच्या ठिकाणी पोलिसांकडून वाहने वळविण्यात आली आहेत.
अवजड वाहनांसाठी दिशादर्शक फलक.
वाहनांच्या रांगा लागू नयेत म्हणून वाहतूक नियंत्रण दिव्यांची यंत्रणा बंद करून पोलिसांकडून नियंत्रण.
चारही मार्गांच्या परिसरात ५२ ठिकाणी तात्पुरत्या पोलीस चौक्या.
रात्री आणि दिवसा, अशा दोन टप्प्यांत पोलिसांची नेमणूक.
एका टप्प्यात १२० पोलीस अधिकारी, कर्मचारी कामावर.