पुणे : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील रावेत ते नऱ्हेपर्यंत २४ किलोमीटर असणाऱ्या सहा पदरी उन्नत प्रकल्पाचे काम केंद्र सरकारच्या मंजुरी अभावी रखडले आहे. भारतीय राजमार्ग प्राधिकारणाकडून (एनएचएआय) या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान परिसरातील (आयटी पार्क) वाहतूक कोंडी आणखी वर्षभर कायम राहणार आहे.
‘आयटी पार्क’मध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावरील देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील रावेत ते नऱ्हे हा सहा पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, बालेवाडी, बाणेर, सुस, बावधन या मार्गे हा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गासाठी सेवा रस्ते विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘एनएचएआय’ने ‘डीपीआर’ तयार करून अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाच्या समितीकडे तपासणीसाठी पाठविला आहे. मात्र, हा ‘डीपीआर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
सेवा रस्ता रुंदीकरणाला मंजुरी
‘एनएचएआय’कडून पिंपरी-चिंचवड, पुणे व ग्रामीण हद्दीतील महामार्गलगत सेवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात रावेत ते वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका भूसंपादन प्रक्रिया राबविणार आहे. तसेच वाकडपासून खेड शिवापूरपर्यंत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर रावेत ते बालेवाडी, बालेवाडी ते वारजे आणि वारजे ते नऱ्हे अशा तीन टप्प्यांत २४ किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे.
रावेत ते नऱ्हेपर्यंतच्या उन्नत मार्गाचा ‘डीपीआर’ तयार झाला असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यासाठी दोन हजार कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येईल.
अंकित यादव, व्यवस्थापक, तांत्रिक विभाग, एनएचएआय