पुणे : कात्रज कोंढवा भागातील वाहतुकीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावरून जाताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून या त्रासातून मुक्तता होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज चौकात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र अशी स्थिती असली, तरी या चौकात असलेली महत्वाची एक जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पथ आणि भूसंपादन विभागाला दिले आहेत.
हेही वाचा – झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !
कात्रज चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सध्या हा चौक बंद केला आहे. या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी आवश्यक असलेली जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर येथील जागा मालकांसह या पुलाच्या कामात कोंढव्याच्या दिशेच्या रॅम्पच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी सात जागांच्या मालकांची बैठक महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी घेतली. यावेळी हमीपत्र देण्याच्या अटीवर या जागा आगावू ताब्यात देण्यास जागा मालकांनी सहमती दर्शविली असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. जागामालक जागा देत नसल्याने हे काम संथ गतीने सुरू आहे. येथील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघात होतात. याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.
हेही वाचा – तबल्याचा ठेका अन् रसिकाग्रणी काका!
या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम वेगाने करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शासनाकडून महापालिकेला १४० कोटींचे अनुदान मिळालेले असूनही ही प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने आयुक्तांनी यात लक्ष घालून बैठक घेऊन प्रशासनाला तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.