लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रज तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाकडून दहा हजार घनमीटर एवढा गाळ तलावातून काढण्यात आल्याने तलावाची साठवणूक क्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे.

कात्रज तलावालगतच्या परिसरात वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसरात अनेक बांधकामे झाल्याने कात्रज तलावात थेट सांडपाणी येत असून, गाळही वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेश सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून तलावाची पाणी साठवणूकक्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुण्यात सांडपाण्याचा पुनर्वापर….४ लाख ९० हजार लिटर पाणी वापरले इमारतींच्या बांधकामासाठी

तलावात अस्तित्वातील सायफनव्यतिरिक्त दोन सायफन नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत. कात्रज तलावाच्या परिसरातील नाल्यांचे ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार तलावामध्ये नाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी नव्याने सांडपाणी वाहिनी विकसित करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

विद्युत विभागामार्फत मड पंपाच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कात्रज तलावात पंप बसविल्यानंतर तलावामधील पाण्याची पातळी पावसाळ्यामध्ये नियंत्रित करणे शक्य होणार आहे. वाहन विभागाकडून जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने तलावातील १० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून, त्यामुळे तलावातील पाण्याची साठवणूकक्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे, अशी माहिती सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.