सहकारी तत्त्वावरील संस्था यशस्वी करून दाखवण्याचं मोठं काम ‘कात्रज दूध संघा’नं करून दाखवलं आहे. ‘कात्रज दूध’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायाची उलाढाल सातत्यानं वाढत आहे..
सहकारी तत्त्वावर एखादा उद्योग-व्यवसाय उभा करून तो यशाप्रत नेणं ही तशी अवघड गोष्ट. महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर अनेक आक्षेप घेतले जात असताना पुण्यातील कात्रज दूध उत्पादक संघाने जे यश गेल्या दशकात मिळवून दाखवलं ते खरोखरच थक्क करणारं आहे. ‘कात्रज दूध’ या ‘ब्रँड’नी शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आणली आणि पुणेकरांच्या पसंतीलाही हा ‘ब्रँड’ तंतोतंत उतरला. कात्रज डेअरीत आपण कधीही गेलो तरी तेथील सर्व उत्पादनांच्या खरेदीसाठी सदैव म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत रांगा लागलेल्या बघायला मिळतात. हीच ग्राहकांनी या ‘ब्रँड’ला दिलेली पावती.
कात्रजची ही यशोगाथा साधारण गेल्या पंधरा वर्षांची. पुणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्याची सहकारी तत्त्वावरील यंत्रणा उभी करण्याच्या उद्देशाने ‘पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा’ची स्थापना सन १९६० मध्ये करण्यात आली. जिल्ह्य़ातून दुधाचं संकलन करून ते मुंबईला ‘महानंदा’ डेअरीला पाठवणं, अशा स्वरुपाचं काम कात्रज डेअरीकडून सुरू होतं. त्या वेळी डेअरीकडून प्रतिदिन ३० हजार ते ५० हजार लिटर दुधाचं संकलन केलं जायचं. मात्र अनेकदा मुंबईत मागणी नसेल तर दूध परत यायचं, शिवाय संस्थेवर शासनाकडून जे कार्यकारी संचालक नेमले जायचे, ते सातत्यानं बदलत राहायचे. परिणामी धोरणात सातत्य रहायचं नाही. एकुणात कामकाज तोटय़ात चाललं होतं. सन २००० नंतर तेव्हाच्या संचालकांनी काही धाडसी निर्णय घेतले आणि दूधविक्रीबरोबरच दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा दूध संघाला चांगला फायदा झाला. दरवर्षीचा तोटा कमी होत पुढे दूध संघ फायद्यात आला. सध्याचा विचार केला तर रोज अडीच लाख लिटर दुधाचं संकलन हा संघ करतो आणि संघाची वार्षिक उलाढाल सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे कोटींच्या घरात गेली आहे. ही प्रगती जशी थक्क करणारी आहे, तशीच ती संचालकांच्या कार्यक्षमतेचीही प्रचिती देणारी आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाबरोबरच सुरुवातीला दही, ताक ही उत्पादनं ‘कात्रज’ने बाजारात आणली आणि नंतरही जी उत्पादनं आली ती ग्राहकांना चांगलीच पसंत पडली. विशेषत: गाईच्या तुपामुळे ‘कात्रज ब्रँड’ चांगलाच नावाजला गेला. त्या बरोबरच म्हैस तूप, क्रीम, श्रीखंड, आम्रखंड, पेढे, मोदक, खवा, आंबा बर्फी, पनीर, टेबर बटर, लस्सी, मटका दही ही आणि अशी अनेक उत्पादनं ‘कात्रज’ने आणली. दूध उद्योगाची बाजारपेठ लक्षात घेऊन या ‘ब्रँड’ने पुढे आइस्क्रीम उत्पादनात प्रवेश केला आणि त्यातही मोठं यश मिळवलं. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादनं आणि तीही आकर्षक पॅकिंगमध्ये आणायची, हा शिरस्ता या ‘ब्रँड’ने कसोशीनं पाळल्यामुळेच ‘कात्रज’ला यश मिळत गेलं.
सहकारी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या या उद्योगाचा पसारा वाढण्याचं आणि ‘कात्रज ब्रँड’च्या यशाचं गमक संघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ काका हिंगे यांनी उलगडून दाखवलं. गावोगावी रोज जे दूध संकलन होतं त्याच्या दर्जात कोणतीही तडजोड आम्ही कधीही करत नाही. जरादेखील शंका आली तर ते दूध नाकारलं जातं. त्या बरोबरच पुण्यातील प्लॅन्टमध्ये जेव्हा प्रत्यक्ष उत्पादन केलं जातं तेव्हा दर्जा, चव यांची काटेकोर तपासणी तज्ज्ञांमार्फत सतत होत असते. त्यामुळे पदार्थाच्या उच्च दर्जात आणि चवीत जराही फरक होत नाही. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असं हिंगे सांगतात. शिवाय बाजारपेठेचा अभ्यास करून उत्पादनांबाबत जे काही निर्णय घ्यावे लागतात, नावीन्य राखण्यासाठी जे बदल करावे लागतात ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य अध्यक्ष काका हिंगे आणि कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे सहकारी तत्त्वावर आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कात्रज दूध संघाचा कारभार चालवणं शक्य झालं आहे.