पुण्यातील कात्रज परिसरात “कात्रजचा खून झाला!” असा मजकूर असलेला एका मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर, शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. तर हा बॅनर नेमका कोणी लावला? ही माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना मिळाली नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
सविता भाभी, शिवडे आय लव्ह यू… अशा बॅनर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसात लागले गेले होते. या बॅनरबाजीची सोशल मीडियावर तेव्हा देखील चांगलीच चर्चा रंगली होती. तर, आता देखील पुण्यातील कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पासून अंतरावर “कात्रजचा खून झाला!” अशा आशयाचा मोठा बॅनर झळकला आहे.
या बॅनरचे फोटो आज सकाळपासुन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कात्रज रस्त्याची सतत होणारी कामे, या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष, या प्रश्नावरून कात्रजचा खून झाला आहे, असं सांगण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी हा बॅनर लावला गेला असावा, असा देखील काहींनी अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, या बॅनरबाबत पोलिसांना विचारले असता, हा बॅनर नेमका कोणी लावला हे अद्याप माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.