पुणे : ‘कविता समजून घ्यायची असेल, तर तिचे गाणे केले पाहिजे या भूमिकेतून मी कविता स्वरबद्ध केल्या’, अशी भावना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी रविवारी व्यक्त केली. ‘प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अन्वयार्थ लावावा, असे वाटते ते अभिजात, अशी माझी धारणा आहे. पूर्वसूरींच्या खांद्यावर बसून आम्ही पाहत असल्याने आम्हाला वेगळे दिसते,’ असेही त्यांनी सांगितले.

समाज माध्यमावर एकत्र आलेल्या तरुणांनी स्थापन केलेल्या रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रसाद ठोसर यांनी कौशल इनामदार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी इनामदार बोलत होते.‘बालगंधर्व’ चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया’ या गीतासाठी आनंद भाटे यांना गायनाचे सर्व पुरस्कार मिळाले. पण, संगीतकार म्हणून माझा नामांकनासाठी विचार झाला नाही. हे गीत बालगंधर्व यांचे नाही असे कोणाला वाटले नाही, हाच त्या गाण्याला मिळालेला पुरस्कार आहे,’ असेही इनामदार यांनी सांगितले.

‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ यांसह विविध गीते सादर करून इनामदार यांनी या मुलाखतीमध्ये अनोखे रंग भरले. लष्करातील जवानांसमवेत दिवाळी, रक्षाबंधन आणि संक्रांत साजरी करण्याबरोबरच समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी कमानीचे डागडुजीकरण असे प्रकल्प ट्रस्टने वर्षभरात पूर्णत्वास आणले आहेत,’ असे ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.