‘आम्हाला प्रसिद्धीची गरजच काय? ..ग्राहकच आमची प्रसिद्धी करतात,’ हा पक्का पुणेरी शिरस्ता बाळगणाऱ्या कयानींचा हा विश्वास खरा ठरला. पुणेकरांनी त्यांना खरोखरच कायम साथ दिली. गावोगावीच नव्हेत, तर परदेशी जाणाऱ्यांबरोबरही इथली श्रुजबेरी बिस्किटे बासनात बांधून जाऊ लागली आणि पुण्याचा ‘ब्रँड’ झालेली ‘कयानी बेकरी’ तिथल्याही खवैय्यांच्या ‘टी पार्टी’ची शोभा वाढवू लागली.
रस्त्याने फिरताना अक्षरश: पावलोपावली अस्सल लोण्याच्या केक- बिस्किटांचा खरपूस घमघमता वास नाकात ओढून घेताना जो परमानंद होतो, त्याचा अनुभव घेण्यासाठी पुण्याच्या कँपमध्येच जायला हवे. येथील असंख्य बेकऱ्यांमधील नानाविध पदार्थासाठी पुणेकर जीव टाकतात. या इतक्या बेकऱ्यांमध्येही ‘कँप आणि कयानी’ हे एक वेगळेच समीकरण आहे. ‘कयानीचा केक’ आणि ‘श्रुजबेरी’ अशी नावे जरी नुसती घेतली तरी खवैय्यांच्या जिभेवर त्याची लोणकढी चव विरघळल्याशिवाय राहात नाही. या चवीमुळेच कयानी बेकरी इतरांपेक्षा वेगळी, खास ठरली.
यंदा एकसष्टी पुरी करणारी ही कयानी बेकरी १९५५ मध्ये १ ऑगस्टला सुरू झाली होती. सुरूवातीचे १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर बेकरी चालवून १५ ऑगस्टपासून बेकरीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले. खोदायार कयानी, रुस्तम कयानी आणि होर्मझदियार कयानी हे तीन बंधू या बेकरीचे जनक. तिघेही मूळचे इराणहून भारतात आलेले. प्रथम काही काळ मुंबईत राहून काम केल्यानंतर पुण्याच्या कँपातील ही जागा विकत घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्याच्याही आधी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ही जागा चक्क ब्रिटिश सैन्याच्या तुकडय़ांसाठी ‘डान्स फ्लोअर’ म्हणून वापरली जायची. आजही बेकरीच्या संगमरवरी टाईल्स ब्रिटिश काळाची साक्ष देतात. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेली ही बेकरी आता परवेझ, सोहराब आणि फारोख हे तीन भाऊ चालवतात. त्यांच्या पुढच्या पिढीतील रुस्तम कयानी आणि सर्वात लहान पौरूषास्प कयानी हेही भागीदार आहेत. कंबर कसून ओव्हनसमोर उभे राहण्यास केव्हाही तयार असणाऱ्या कयानी परिवारातील पुरुषांपैकी फक्त पौरुषास्प यांनीच ‘बेकिंग’चे औपचारिक शिक्षण घेतले आहे. रुस्तम कयानीही परदेशी गेल्यावर आवर्जून एखाद्या ‘बेकिंग’च्या अभ्यासक्रमात नवीन काही शिकतात. युरोपियन आणि अमेरिकन बेकिंगमधील फरक आणि त्याचे शास्त्र शिकून घेणे त्यांना अजूनही महत्त्वाचे वाटते. आधीच्या पिढय़ांना औपचारिक शिक्षण नसले तरी ‘बेकिंग’चे बाळकडू सर्वाना घरातूनच मिळाले आहे.
या बेकरीत अगदी सुरुवातीला मिळणारे पदार्थ आणि आताचे पदार्थ यात बराच फरक आहे. सुरुवातीला इथे वेगवेगळ्या स्वादांच्या ‘कट पेस्ट्री’ मिळायच्या. पण असे पदार्थ बनवायला वेळ आणि मनुष्यबळही जास्त लागते. शिवाय लांबच्या ग्राहकांना बांधून घरी नेण्यासही ते गैरसोईचे होत होते. प्लेन केक, फ्रूट केक, पाऊंड केक, चॉकलेट वॉलनट केक, श्रुजबेरी बिस्किट, वाईन बिस्किट हे पदार्थ मात्र कायम ग्राहकांच्या आवडीचे राहिले. उत्तम कच्चा माल आणि बनवण्यातील स्वच्छता यामुळे चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीस ते उतरले. यातील श्रुजबेरी बिस्किटे कयानींचीच खासियत. पण मूळच्या युरोपियन ‘श्रुजबेरी शॉर्ट ब्रेड कुकी’चा आणि कयानींच्या श्रुजबेरी बिस्किटांचा काही संबंध नाही. युरोपियन श्रुजबेरीत अंडेही घालतात, कयानींच्या श्रुजबेरीत अंडे अजिबात नाही. नुसता खोका उघडला तरी मोहून टाकणारा लोण्याचा वास हे या बिस्किटांचे वैशिष्टय़. पूर्वी त्यासाठी ‘पोलसन’ बटर वापरले जात असे, आता अमूल बटर वापरले जाते.अजूनही या बेकरीत पदार्थाची नावे लिहायला फळा आणि खडूच वापरला जातो. श्रुजबेरी बिस्किटांचे निस्सिम भक्त कधीतरी ‘काही नवीन आहे का,’ अशी विचारणा करतात. आणि ‘चॉकलेट चिप कुकीज’, ‘मँगो केक’, ‘बनाना केक’ असे नवीन प्रकारही या फळ्यावरील यादीत जाऊन बसतात. कँपातील इतर बेकऱ्यांबद्दलचा आदरही कयानी परिवाराच्या बोलण्यात सतत डोकावतो. स्थानिक बेकर्स त्यांच्या कामात खूप गुणी आहेत, प्रत्येकाची चव वेगळी आहे, हे सांगायला ते विसरत नाहीत. सिटी बेकरी, रॉयल बेकरी, फर्नाडिस बेकरी, पर्शियन बेकरीचा विशेष उल्लेख करायलाही ते विसरत नाहीत.
पदार्थाच्या ‘मार्केटिंग’च्या बाबतीत मात्र कयानीचा शिरस्ता पक्क्य़ा पुणेकराचा आहे. ‘आमची कुठेही शाखा नाही,’ ‘पुण्याची कयानी बेकरी’ म्हणूनच ओळखलेले आम्हाला आवडेल,’ असा त्यांचा विश्वास. ‘प्रसिद्धीची गरजच काय? ..ग्राहकच आमची प्रसिद्धी करतात,’ हे ओघाने आलेच! कयानींचा हा विश्वास खरा ठरला आणि पुणेकरांनी खरोखरच त्यांना कायम साथ दिली. गावोगावीच नव्हे, तर परदेशी जाणाऱ्यांबरोबरही इथली श्रुजबेरी बिस्किटे बासनात बांधून जाऊ लागली आणि पुण्याचा हा ‘ब्रँड’ तिथल्याही खवैय्यांच्या ‘टी पार्टी’ची शोभा वाढवू लागला.
sampada.sovani@expressindia.com