पिंपरीः आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपबरोबर एकत्र लढण्याचे धोरण ठरले असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना ‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.‘बाळासाहेबांची शिवसेने’चा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला मेळावा ऑटो क्लस्टर येथे घेण्यात आला. त्यावेळी बारणे बोलत होते. मेळाव्याला कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, मावळचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, शहरप्रमुख निलेश तरस, युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे, जितेंद्र ननावरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे : दुचाकींच्या बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात; दुचाकीसह तीन बॅटरी जप्त
बारणे म्हणाले की, सरकारच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षाचा भव्य मेळावा घेतला जाणार आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुका या भाजपशी युती करून लढविण्यात आल्या. युती म्हणून लोकांनी निवडून दिले. मात्र, सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जावे लागले. ते कोणालाही मान्य नव्हते. लोकभावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली. त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे हा उद्रेक झाला. नागरिकांची कामे करण्यासाठी पक्षप्रमुखांची ताकद मिळाली नाही, असे बारणे यांनी सांगितले.लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तेवढेच काम केले होते. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती आहे, असे बारणे म्हणाले.