ग्रामीण भागात श्वसनाच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच उपचार, समज, गैरसमज यांबाबत प्रबोधन करण्यासाठी पुण्यातील केईएम हॉस्पिटल रीसर्च सेंटरतर्फे एका विशेष लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमधील ग्लोबल हेल्थ रीसर्च युनिट इन रेस्पिरेटरी हेल्थच्या आर्थिक सहकार्यातून या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून ग्रामीण आणि शहरी भागात हा लघुपट दाखवण्याचे नियोजन असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
केईएम हॉस्पिटल रीसर्च सेंटरचे छाती आणि श्वासरोग तज्ज्ञ डॉ. पराग खटावकर म्हणाले, सीओपीडी आणि अस्थमा या दोन श्वसनाच्या आजारांबाबत सर्वाधिक गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांचे निदान होण्याचे प्रमाणही कमी आहे. लघुपटाच्या माध्यमातून या आजारांविषयी असलेले गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न आहे. अस्थमा या आजारावर इन्हेलरद्वारे औषध घेणे हे रुग्णासाठी सर्वात सोयीचे आणि परिणामकारक असते.
हेही वाचा : डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ला साहित्य अकादमी पुरस्कार
मात्र, त्याबाबतच्या गैरसमजांमुळे रुग्ण इन्हेलरचा वापर करणे टाळतात. पर्यायाने त्यांना होणारा त्रास बळावतो. त्यावर उपाय म्हणून इन्हेलरची उपयुक्तता, आजारांबाबतची शास्त्रीय माहिती या गोष्टी लघुपटाद्वारे समाजातील सर्व स्तरांत पोहोचवण्याची गरज वाटल्याचे डॉ. खटावकर यांनी स्पष्ट केले.
केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे प्राध्यापक आणि वढू येथील ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. संजय जुवेकर म्हणाले, श्वसनरोग पुनर्वसन केंद्र (पल्मनरी रिहॅबिलिटेशन सेंटर) हे भारताच्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेले पहिले केंद्र आहे. या केंद्रातील उपक्रमांमुळे श्वसन विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर पर्यायाने त्यांच्या जीवनमानावरही सकारात्मक परिणाम होत असल्याचे डॉ. जुवेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच लघुपटाद्वारे केलेल्या जनजागृतीमुळे श्वसन विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.