नैर्ऋत्य मान्सून जूनच्या पहिल्या आठवडय़ातच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होणार असल्याचा पुनरुच्चार हवामान विभागाच्या सूत्रांनी केला. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा जोर वाढेल आणि तो मध्य भारतात पोहोचेल, असेही सांगण्यात आले.
मान्सून देशात उशिरा दाखल होणार असल्याबाबत गेले काही दिवस बोलले जात आहे. याबाबत पुणे वेधशाळच्या अधिकारी डॉ. सुनीता देवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मान्सून जूनच्या पहिल्या आठवडय़ातच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
‘‘सध्या मान्सून बंगालच्या उपसागरापर्यंत आला आहे. तो तिथेच खोळंबला आहे. तो पुढच्या काही दिवसांत पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नाही. मात्र, त्याचा पुढचा प्रवास हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून ५ जून रोजी केरळ किनाऱ्यावर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हे आगमन चार दिवस पुढे-मागे होऊ शकते. त्यानुसार तो जूनच्या पहिल्या आठवडय़ातच केरळमध्ये पोहोचेल. मात्र, या दरम्यान मान्सूनच्या प्रवाहाची तीव्रता फारशी नसेल. जूनच्या मध्यावर त्याची तीव्रता वाढून तो देशाच्या काही बऱ्याचशा भागात पुढे सरकेल,’’ असे डॉ. सुनीता देवी म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्रातच्या बऱ्याचशा भागात सध्या वादळी पावसाचे वातावरण आहे. दुपापर्यंत उकाडा आणि त्यानंतर ढगांच्या गडगडाटात पावसाच्या सरी पडत आहेत. पुढील तीन-चार दिवसांतही विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी असे वातावरण असेल. सध्या ईशान्य भारतात मोठय़ा प्रमाणात पावसाच्या सरी पडत आहेत, अशी माहितीही डॉ. देवी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा