लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी करता येईल, याचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. या जागेचा वापर नगरचना योजना किंवा व्यावसायिक कारणासाठी करण्याचे नियोजित आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला असून त्याला राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीनेही मान्यता दिली आहे. अद्याप राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाही. ही योजना दीड हजार कोटी रुपयांची असून बोगद्यामुळे अडीच अब्ज घनफूट पाण्याची बचत होणार आहे.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेच्या अर्जांच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेचा वापर करण्याची सूचना महापालिकेला केली होती. योजनेचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी वापर करता येणे शक्य आहे. त्यानुसार उड्डाणपूल, मेट्रोचा पर्यायाचा विचारही सुरू झाला आहे. ही जागा ५०० मीटर ते एक किलोमीटर इतक्या रुंदीची आहे. त्यातील काही भाग महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या हद्दीत येत आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर जागा महापालिकेकडे हस्तांतरित होणार असून जागेचा वापर करून निधी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. योजनेमुळे कालव्याची जी जागा उपलब्ध होणार आहे तिचा वापर कसा करता येईल याचे सर्वेक्षण सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू केले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत अहवाल महापालिकेला मिळेल. त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

Story img Loader