पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ४२८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणांच्या जलाशयात येणाऱ्या पाण्यानुसार पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी / जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात वाहने, जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांनी सतर्क राहावे, असेही जलसंपदा विभागाने कळविले आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत टेमघर धरणात ४५ टक्के, वरसगाव धरणात ६१ टक्के, पानशेत धरणात ६७ टक्के, तर खडकवासला धरणात ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.