पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दोन नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी देत राज्य शासनाने पुणेकरांना दिवाळी भेट दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडकवासला ते खराडी आणि नळस्टाॅप ते माणिकबाग असे दोन नवे उन्नत मार्ग सोमवारी मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही मार्गिकांच्या कामांसाठी एकूण ९ हजार ८९७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राज्य शासनाच्या मान्यतेनंतर तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. या दोन नव्या मार्गिकांमुळे शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा एकूण ३२ किलोमीटर अंतराच्या दोन मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे स्वारगेटपासून कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या विस्तारित मेट्रो मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित’ करा या तत्वावर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची कामे प्रगतीपथावर आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय? टोळीतील सराइतांची झाडाझडती सुरू

मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी असा मार्ग करण्यात येणार आहे. तर नळस्टाॅप-वारजे-माणिकबाग असा दुसरा मार्ग असेल. खडकवासला ते खराडी मार्गाची एकूण लांबी २५.५१८ किलोमीटर एवढी असून त्यामध्ये २२ स्थानके आहेत. या मार्गिकेसाठी ८ हजार ११ कोटी ८१ लाखांचा खर्च होणार आहे.

नळस्टाॅप ते माणिकबाग मार्गिका ६.११८ किलोमीटर अंतराची असून त्यामध्ये सहा स्थानके प्रस्तावित आहेत. त्यासाठी १ हजार ७६५ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३१.६४ किलोमीटर अशी आहे.

हेही वाचा >>>राज्यात यंदा ‘आरटीई’च्या २६ हजारांहून अधिक जागा रिक्त… नेमके काय झाले?

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. मेट्रोची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली असून मेट्रो सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. त्यातच नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे विस्तारण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोची शिवाजीनगर ते स्वारगेट या तीन किलोमीटर अंतरातील भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पुण्यात आणून ‘मतपेरणी’ करण्याचा मानस महायुतीचा होता. मात्र अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने या मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर आता दोन नव्या मार्गिकांना मंजुरी देत महायुतीने पुन्हा निवडणुकीत मते मिळविण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.

असे आहेत नवे मार्ग

मार्ग १

– खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी

– मार्गिकेची लांबी- २५.५१८ किलोमीटर

– स्थानकांची संख्या – २२

– खर्च – ८ हजार १३१.८१ कोटी

मार्ग २

– नळस्टाॅप-डहाणूकर काॅलनी-वारजे-माणिकबाग

– मार्गिकेची लांबी- ६.११८ किलोमीटर

– स्थानकांची संख्या – ६

– खर्च- १ हजार ७६५.३८ कोटी

दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी

– ३१.६५ किलोमीटर

एकूण खर्च- ९ हजार ८९७.१९ कोटी

– दोन्ही मार्गिकांचे स्वरूप- उन्नत

नव्या मेट्रो मार्गिकांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि सोलापूर रस्ता परिसरातील प्रवाशांना पिंंपरी-चिंचवड, रामवाडी, वनाज आणि स्वारगेट येथे जलद आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो