सागर कासार

पुण्यात राहणारे मेजर शशीधरन नायर हे २ जानेवारी रोजी रजा संपवून ड्यूटीवर परतले होते, शुक्रवारी सकाळी त्यांचे कुटुंबीयांशी बोलणेही झाले, पण संध्याकाळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात शशीधरन शहीद झाले आणि पुण्यात राहणाऱ्या नायर कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. नायर कुटुंब राहत असलेल्या सोसायटीत सध्या शोककळा पसरली असून वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शशीधरनच्या आठवणीने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले होते.

जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात शुक्रवारी पुण्यातील मेजर शशी नायर शहीद झाले. मेजर नायर यांचे कुटुंबीय गेल्या ३५ वर्षांपासून खडकवासला परिसरात राहत होते. शशी यांचे वडील विजय यांचे नऊ वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले आहे. तर मेजर नायर यांची आई अजूनही क्लास घेतात. त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती आणि आई लता असा परिवार आहे.

मेजर नायर शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी नायर यांच्या घराबाहेर गर्दी केली. अनेकांचे डोळे पाणावले होते. नायर यांच्या एका नातेवाईकाने मेजर नायर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले. शशीधरनने १० वी नंतर सैन्यात जाण्याचे ठरवले. तो शिक्षण घेत असताना महाविद्यालयात सायकलने जायचा. महाविद्यालय ते घर हे अंतर जवळपास ३० किलोमीटर होते, असे त्या नातेवाईकाने सांगितले. शुक्रवारी सकाळीच त्याचे कुटुंबीयांशी बोलणे झाले आणि रात्री शशीधरन शहीद झाल्याचे समजले, असेही त्या नातेवाईकाने सांगितले. मेजर शहीद झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

Story img Loader