खडकवासला धरण चौपाटी परिसरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी महापालिका आणि पोलिसांकडून ठोस पाऊले उचलण्यात येणार आहेत. खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली झाली असून हवेली पोलीस ठाण्याकडूनही त्याबाबत पाठपुरावा सुरू झाला आहे. पोलिसांकडून पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडूनही आवश्यक कार्यवाही सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकवासला गाव परिसरात वेल्हा तालुक्यातील ४० ते ४५ आणि हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत १२ लहान मोठी गावे आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची व्यवहरासाठी दैनंदिन ये-जा सुरू असते. त्याचबरोबर व्यावसायिक, सरकारी, निमसरकारी आणि अन्य कामांसाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्याचबरोबर सिंहगड किल्ला, पानशेत धरण, खडकवासला धरण परिसाराला दररोज शेकडो नागरिक भेट देत असतात. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

खडकवासला चौपाटी जवळील पुणे-पानशेत हा रस्ता अरूंद आहे. सिंहगड किल्ला, पानशेत, वरसगांव धरण तसेच आसपासच्या ४० ते ४५ गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोटारी, दुचाकी, पीएमपीसह अन्य अवजड वाहननांची सातत्याने ये-जा असते.खडकवासला धरण परिसरात येणारे पर्यटक रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडी होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा वेगही मंदावतो. शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना धावाधाव करावी लागते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीच आता बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत.

हवेली पोलिसांनी पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला असून खडकवासला धरण चौपाटी परिसरात महापालिकेने सुसज्ज वाहनतळ उभारावे, असे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांच्या या पत्राची दखल घेत वाहतूक प्रकल्प विभागानेही कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे-पानशेत हा रस्ता रहदारीचा असून खडकवासला चौकातून एक रस्ता उत्तमनगरकडे तर एक रस्ता खडकवासला बाह्यवळणाबरोबच दुसरा रस्ता खडकवासला गावात जातो. या परिससरात लहान मोठी उपहारगृहे, बंगले, फार्म हाऊस आहेत. त्यामुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. या परिसरात लहान-मोठे पथारी व्यावसायिक, हातगाडीवाले आणि अन्य खाद्यपदार्थ विक्रींचे स्टॉल मोठ्या प्रमाणर आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या गाड्या रस्त्यावरच वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या असतात. वाहनतळामुळे या बेशिस्तीला लगाम बसणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadakwasla traffic issue will be solved with help of parking space pune print team scsg
Show comments