पुणे : शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्रोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

शहर परिसरात जीबीएस रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर दूषित पाण्यामुळे ही बाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. सिंहगड रस्ता परिसरात या आजाराचे ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागांतील १४४ नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. यात सिंहगड रस्ता परिसर, खडकवासला धरण जलाशय आणि पिंपरी-चिंचवडमधील पाणी नमुन्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खडकवासला धरणातील एक नमुना, सिंहगड रस्ता परिसरातील ४ नमुने आणि पिंपरी-चिंचवडमधील ३ नमुन्यांमध्ये ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म हे जीवाणू आढळले. हे दोन्ही जीवाणू उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या विष्ठेमध्ये आढळतात. त्यामुळे मानवासह इतर प्राणीविष्ठेमुळे जलस्त्रोत दूषित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाण्यामध्ये जीवाणू आढळल्याने ते पाणी मानवास पिण्यास अयोग्य आहे. हे पाणी पिल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रक्रिया करूनच हे पाणी नागरिकांना पिण्यास द्यायला हवे, असेही सूत्रांनी सांगितले.

कॅम्पायलोबॅक्टरची चाचणी नाही

राज्य आरोग्य प्रयोगशाळेत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या ‘जीबीएस’ला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूची तपासणी होत नाही. केवळ ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म यांची चाचणी प्रयोगशाळेत होते. त्यामुळे या पाण्यात कॅम्पायलोबॅक्टरसह इतरही जीवाणू असण्याची शक्यता आहे. मात्र, खडकवासला धरणातील पाण्यात कोणतेही रासायनिक घटक आढळलेले नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पाणी पिण्यास का अयोग्य?

  • पाण्यात ई-कोलाय, कोलीफॉर्म जीवाणू
  • उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या विष्ठेत दोन्ही जीवाणूंचे अस्तित्व
  • पाण्यात मानवासह प्राण्यांची विष्ठा मिसळल्याचे निष्पन्न
  • पाणी पिल्यास जीवाणू संसर्गाचा धोका
  • प्रक्रिया न करता पाणी पिल्यास आरोग्य समस्या

Story img Loader