कष्टामुळे आहार अधिक असलेल्या आणि त्यामुळे खानावळींना जड वाटणाऱ्या कामगारांना हमाल पंचायतीच्या ‘कष्टाची भाकर’ने भक्कम आधार दिला. ‘स्वच्छ, स्वस्त, सकस आणि ताजे अन्न’ हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य. पुण्याच्या पूर्व भागाचे वैभव ठरलेला हा उपक्रम केवळ हमाल आणि कष्टकऱ्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही, तर पुण्यात शिकायला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांपासून चवीने झुणका-भाकरी खाणाऱ्या खवैय्या पुणेकरांपर्यंत सर्वाना त्याने सढळ हाताने जेवू घातले. इतकेच नव्हे, तर पुण्याबाहेरही अनेक ठिकाणी स्वस्त दरातील झुणका-भाकरीच्या संकल्पनेला पुण्याच्या या आगळ्या ‘ब्रँड’ने प्रेरणा दिली.
सत्तरच्या दशकाचा पूर्वार्ध. राज्यात दुष्काळाची परिस्थिती. पुण्याच्या ग्रामीण भागातून आणि अगदी मराठवाडय़ातूनही खूप मोठय़ा संख्येने कामगार पुण्यात आलेले. या कामगारांचे रोजचे जगणे अतिशय खडतर. पुण्यात स्वत:चे घर नाही. दिवसभर प्रचंड कष्ट उपसायचे आणि खानावळीत जेवायचे अशी परिस्थिती. अंगमेहनतीमुळे भूकही सपाटून लागायची. हा कामगार जेव्हा खानावळीत जेवायचा, तेव्हा इतर मंडळी जेवून उठली तरी त्याची भूक बाकी असेच. मग खानावळीतील बाई रागेजून म्हणायची, ‘रांधून माझं मनगट तुटंल, पण या मेल्याची भूक काही मिटणार नाही!’
अनेक कष्टकऱ्यांच्या या रोजच्या अनुभवातून पुढे काहीतरी भव्यदिव्य असे जन्मास येणार आहे आणि स्वस्त पण दर्जेदार आहार पुरवणाऱ्या व्यवस्थांमध्ये एक ‘ब्रँड’ म्हणून ती व्यवस्था उभी राहणार आहे, याची त्या बिचाऱ्या कामगारांना त्या वेळी कल्पनाही आली नसेल. हमाल पंचायतीने सुरू केलेल्या ‘कष्टाची भाकर’ या उपक्रमाची कथा!
१९७४ मध्ये २ ऑक्टोबरला ‘कष्टाची भाकर’ सुरू झाली. आता बदललेल्या काळातही पुण्यात राहण्याचा आणि जेवणाचा खर्च दिवसेंदिवस सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ५ रुपयांना पोळी, ८ रुपयांना भाकरी, ५ रुपयांना पिठले (बेसन) आणि ७ रुपयांना भाजी कुठे मिळू शकेल का?..अशक्यप्राय वाटणाऱ्या या किमती ‘कष्टाची भाकर’मध्ये गेल्यावर बघायला मिळतात. पुण्यातील विविध ‘डायनिंग हॉल’मधील जेवणाची सवय झालेल्यांना इथे नगावर मिळणारे पदार्थ बघून आश्चर्यच वाटेल. जवळपास ३०-३५ रुपयांत पोटभर जेवणे इथे सहज शक्य आहे. हे दर सुद्धा ‘वाढलेले दर’ आहेत हे ऐकून तर धक्काच बसेल! ऑगस्टमध्ये ‘कष्टाची भाकर’ला शासनाकडून मिळणारा केरोसीन आणि साखरेचा कोटा बंद झाला. त्यानंतर काही वस्तूंचे भाव वाढले. त्यापूर्वी चपाती आणि पिठले दोन्ही प्रत्येकी ४ रुपयांत मिळत असे. या संपूर्ण व्यवसायासाठी बाहेरून मदत घेतली जात नाही हे आणखी एक वैशिष्टय़. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सर्व चालते. सकाळी साडेसहा वाजता इथला नाष्टा सुरू होतो, तो पावणेनऊ पर्यंत चालतो. अगदी पूर्वी या नाष्टय़ात आठ आण्यात गव्हाची लापशी मिळे, आता पोहे आणि शिरा मिळतो. जेवणाचीही लगबग सकाळी खूप लवकर सुरू होते. सकाळी साडेआठ-नऊ वाजता जेवण सुरू होते आणि बस आणि रिक्षाचालक, कामगार जेवून पुढे कामाला जातात. दिवाळीत ‘पूना र्मचट चेंबर’ने बनवलेला लाडू-चिवडा जसा लोकप्रिय ठरतो, तसाच ‘कष्टाची भाकर’मध्येही लाडू-चिवडा मिळतो. कष्टकऱ्यांच्या जेवणाऱ्या चवीची मागणी काहीशी वेगळी असल्यामुळे इथला चिवडा चवीला थोडा मसालेदार असतो, असे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन पवार सांगतात.
‘झुणका- भाकर’ स्वस्त दरात देण्याचे उपक्रम पुण्याबाहेरही अनेक ठिकाणी सुरू होण्यास ‘कष्टाची भाकर’ प्रेरणादायी ठरली. मागील युती शासनाच्या काळातही अशी केंद्रे सुरू झाली. बाहेरच्या राज्यातून अनेक संस्थांचे प्रतिनिधी, अगदी परदेशी विद्यार्थीही या व्यवस्थेचे कामकाज आवर्जून पाहून जातात. भवानी पेठेत अन्न तयार करण्याचे प्रमुख काम चालते. आता पुण्यात ‘कष्टाची भाकर’च्या पुणे स्टेशन, मालधक्का, मार्केटयार्ड मंडई, मार्केटयार्ड धान्य बाजार, नाना पेठ अशा अकरा शाखा आहेत. शिवाय एक फिरती व्हॅनही आहे. रोज दोन्ही वेळी तब्बल १३ ते १४ हजार लोक इथे जेवून जातात. हमालांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींना रोजगार मिळवून देण्यातही या उपक्रमाचा मोठा आधार लाभल्याचे ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव नमूद करतात. अशा ४५ महिलांसह एकूण १६० कामगार ‘कष्टाची भाकर’चे काम करतात. अनेक सामाजिक चळवळीच्या परिषदा, सभा पुण्यात होतात. तेव्हा आवर्जून ‘कष्टाची भाकर’चे जेवण मागवले जाते. त्या अर्थाने एक प्रकारे हे सामाजिक चळवळींचेही आधार केंद्र बनले आहे. पुण्याच्या पूर्व भागाचे वैभव ठरलेला हा उपक्रम केवळ हमाल आणि कष्टकऱ्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. पुण्यात शिकायला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांपासून चवीने झुणका-भाकरी खाणाऱ्या खवैय्या पुणेकरांपर्यंत सर्वाना त्याने सढळ हाताने जेवू घातले आहे, हेच त्याच्या वेगळेपणाचे गमक ठरावे.
sampada.sovani@expressindia.com