साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेला जेजुरीचा मल्हारी आता सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे .राज्यातील मटणाच्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन द्यायचे की नाही यावर क्रिया प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काल खंडोबा देवसंस्थानचे एक विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून मटन दुकानांना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर मल्हार नाव देण्यास विरोध केला आहे. खंडोबा हा शाकाहारी देव असल्याने दुसरे कोणतेही नाव या योजनेला द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर आज सकाळी श्री मार्तंड देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या योजनेचे स्वागत करण्यात आले. श्री मल्हार म्हणजेच खंडोबा हा साऱ्या हिंदू धर्माचे कुलदैवत आहे .प्रत्येक मल्हार भक्त आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवताच्या साक्षीने व त्याचे स्मरण करून करतो .हिंदू समाजामध्ये मांस मटन विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेट देण्याची योजना सुरू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे यावेळी स्वागत करण्यात आले. विश्वस्त मंडळाने बहुमताने या योजनेस मल्हार सर्टिफिकेशन असे नाव देण्यास पाठिंबा दिला.
या बैठकीसाठी मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे ,ऍड विश्वास पानसे, अनिल सौंदडे , पोपट खोमणे, हे उपस्थित होते . मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन देण्यास पाठिंबा असल्याचे निवेदन देवस्थान समितीने प्रसिद्ध केले आहे .मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी राज्यातील अनेक दुकानांना मल्हार मटन शॉप, तुळजाभवानी मटन शॉप अशी नावे यापूर्वी देण्यात आलेली आहेत .आता विरोध करण्याचे कारण नाही.
आम्ही या योजनेचे स्वागत करीत आहोत बहुमताने पाठिंबा देत आहोत असे सांगितले.
जेजुरीकर ग्रामस्थ मंडळाचा मल्हार नाव देण्यास विरोध
जेजुरीचा खंडोबा हे पूर्णतः शाकाहारी दैवत असल्याने त्याला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. मांसाहारी नैवेद्य देवाची धाकटी बायको बानू देवी हिला दाखवला जातो. खंडोबा गडावर मटणाचा नैवेद्य कधीही नेला जात नाही. शासनाने सर्टिफिकेटची आणलेली योजना चांगली असून त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र या सर्टिफिकेशन योजनेस मल्हारी नाव न देता इतर नाव द्यावे. कोणत्याही देवाचे नाव देण्यास आमचा विरोध आहे असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या बैठकीच्या वेळी खंडोबा देवस्थानचे माजी विश्वस्त सुधीर गोडसे ,संदीप जगताप ,शिवराज झगडे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे ,सचिव छबन कुदळे, तुषार कुंभार, निलेश हरपळे ,मनोज शिंदे ,संतोष खोमणे पाटील, पुजारी गणेश आगलावे आदी उपस्थित होते . लवकरच ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,मंत्री नितेश राणे, आमदार विजय शिवतारे यांना निवेदन देण्यात आहे .आमची मागणी मान्य न झाल्यास समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी सेवेकरी येणाऱ्या काळात आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात आले.