साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर रविवारी ( १५ ऑक्टोबर ) सकाळी ११ वाजता धार्मिक वातावरणात राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के यांच्या हस्ते घटस्थापना स्थापना करण्यात आली.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे, अनिल सौंदडे, वकील पांडुरंग थोरवे, वकील विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, खांदेकरी मानकरी ट्रस्टचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, पुजारी गणेश आगलावे, मिलिंद सातभाई, माधव बारभाई, चेतन सात भाई, ऋषिकेश सातभाई, धनंजय आगलावे, वैभव दिडभाई, अनिल बारभाई, दीपक बारभाई आदी उपस्थित होते.
हेही वाचा : धार्मिक वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला साताऱ्यात प्रारंभ
वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. पहाटे नेहमीप्रमाणे खंडोबाची भूपाळी झाल्यावर सर्व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. भंडार घरामध्ये ठेवलेल्या उत्सव मूर्ती मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आल्या. तेथे पाखळली झाल्यावर सनई चौघड्याच्या निनादात उत्सव मूर्ती नवरात्र महालामध्ये ( बालदारी ) आणण्यात आल्या. या ठिकाणी अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली. यावेळी घडशी समाज बांधवांनी पारंपारिक सनई चौघडा वादन केले.
हेही वाचा : तुळजाभवानीच्या चरणी थायलंडची फुले, तेराशे किलो फुलांनी सजला कुलस्वामिनी जगदंबेचा दरबार
जेजुरीचा दसरा उत्सव, खंडा उचलणे स्पर्धा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. घटस्थापनेनिमित्त खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामस्थांना व येणाऱ्या भाविकांना नवरात्र उत्सव काळात उंबऱ्यातून दर्शनाचा लाभ मिळणार आहे.