पावसाच्या अवकृपेमुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्य़ात खरिपाचे उत्पादन घटले आहे. तर अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. या दुष्काळाचा मोठा फटका फळबागा आणि ऊ स क्षेत्राला बसणार आहे. गेली अनेक वर्षे मोठय़ा कष्टातून उभ्या केलेल्या बागा भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने जळून जाण्याची चिन्हे आहेत.

सांगलीतील अनेक तालुक्यात यंदा पावसाळ्यातच दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्य़ातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज आणि तासगाव तालुक्यात याची झळ तीव्र आहे.  पश्चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस, थोडका कडेगाव, मिरज तालुक्याचा पश्चिम भाग वगळता अन्यत्र आताच तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. काही गावांमध्ये खासगी टॅंकरने पाणी पुरवठा होत असून जत तालुक्यात आताच पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

सोलापुरातही सारखीच परिस्थिती आहे. जिल्ह्य़ात यंदा गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ ३८ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. यामुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ात सरासरी ४८८.८३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो केवळ १८९.९० मिमी इतकाच झाला आहे. करमाळा तालुक्यात तर तो २५ टक्केच  झाला आहे. काही मंडलांमध्ये तर १० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ात यंदा दोन लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. रब्बी हंगामासाठी कृषी खात्याने सात लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले असताना पेरण्या होण्याची शक्यता नसल्याने संपूर्ण हंगामाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

नगर जिल्ह्य़ालाही कोरडय़ा आभाळाची मोठी झळ बसत आहे. जिल्ह्य़ात  ६८ टक्के पाऊ स झाला आहे. कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, नेवासे या जिरायत भागात खरिपाची पिके जळून गेली. सुमारे ५ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पीक घेण्यात आले. सोयाबीन, मूग, तूर, उडीद ही या भागातील प्रमुख पिके. त्यांचे उत्त्पन्न घटले. गेल्या वर्षी उत्पादन वाढल्याने सरकारी खरेदी केंद्रे सुरु झाली. पण यंदा उत्पादनच नसल्याने केंद्रे सुरु करण्याची मागणी कुठेही होताना दिसत नाही. रब्बीचे सुमारे साडेसात लाख हेक्टरचे क्षेत्र आहे. मात्र यंदा पावसाअभावी पेरणीच झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांनंतर लाखो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची ही वेळ आली आहे.

थोडासा आधार..

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांना या दुष्काळाची झळ तुलनेने कमी आहे. यातील कोल्हापुरात तर दुष्काळ नसल्यासारखाच आहे. साताऱ्यातील माण, खटाव, खंडाळा, फलटण आणि कोरेगाव हे तालुके पर्जन्यछायेतील समजले जातात. या तालुक्यांमध्ये दरवर्षी पावसाचे प्रमाण हे कमीच असते. यंदाही या तालुक्यात पावसाने हात आखडता घेतला आहे. यामुळे या भागातील कोरडवाहू जमिनीतील खरिपाचे पेरे अडचणीत आले आहेत. खंडाळा आणि फलटण तालुक्यातील मोठय़ा क्षेत्रास यंदा धोम, बलकवडी आणि वीर धरणांच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.

पाण्यावरून वाद?

जलयुक्त शिवारअंतर्गत सुमारे ७०० गावात जलसंधारणाची कामे करण्यात आली. पण पाऊसच नसल्याने काही गावांमधील तळयांमध्ये पाणी आले नाही. नगर जिल्ह्य़ात सुमारे ४९ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात येत आहे.  पावसाळ्यात टँकर सुरु करण्याची वेळ जिल्ह्य़ात आली. सुदैवाने यंदा भंडारदरा, निळवंडे, गंगापूर, दारणा, मुळा व कुकडीच्या धरणात चांगला पाणीसाठा आहे. मात्र आता या पाण्यावरुन आता प्रादेशिक वाद निर्माण होणार आहे.

(लेखन सहभाग दिगंबर शिंदे, एजाजहुसेन मुजावर, अशोक तुपे, विश्वास पवार)