पॉट आइस्क्रीम ही आइस्क्रीम तयार करण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत वापरून गिरीश खत्री यांनी अठ्ठावीस वर्षांपूर्वी आइस्क्रीम विक्रीला सुरुवात केली. पॉट आइस्क्रीमची चव चाखण्यासाठी आवर्जून खत्री बंधूंकडे जाणारी अनेक मंडळी आहेत.

आइस्क्रीम तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातील पॉट आइस्क्रीम ही आइस्क्रीम तयार करण्याची एक पारंपरिक पद्धत. ही पद्धत आता मागे पडली असली, तरी अगदी पूर्वीच्याच पद्धतीनं पॉट आइस्क्रीम तयार करणारे काही व्यावसायिक आजही पुण्यात आहेत. त्यातलं एक अग्रणी नाव म्हणजे ‘खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी.’ खत्री पॉट आइस्क्रीम या नावानं हे आइस्क्रीम ओळखलं जातं. राजाराम पूल ते कर्वेनगर दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर गिरीश खत्री यांनी एका छोटय़ा स्टुलावर एक ट्रे, पाच-दहा वाटय़ा-चमचे आणि आइस्क्रीमचा पॉट मांडून आइस्क्रीमची विक्री सुरू केली, त्याला आता पंचवीसहून अधिक वर्ष झाली आहेत. घरखर्चाला थोडी मदत करावी असा विचार करून गिरीशने १९८९ मध्ये शाळेच्या उन्हाळी सुटीत अगदी छोटय़ा स्वरूपात सुरू केलेल्या आइस्क्रीम विक्रीचं गिरीश आणि राहुल या खत्री बंधून हळूहळू एका मोठय़ा व्यवसायात रूपातंर केलं आहे. पण व्यवसाय वाढला, दुकानं वाढली तरीही पॉट आइस्क्रीम ही मूळ पद्धत मात्र खत्री बंधूंनी आजही बदललेली नाही आणि त्यामुळेच ज्यांना पॉट आइस्क्रीम हवं असतं ते खत्री बंधूंकडेच जातात.

खत्री बंधू आइस्क्रीम सुरू झालं, तेव्हा फक्त मँगो आइस्क्रीम विकलं जायचं. कारण गिरीश खत्री यांना व्यवसायाचे असे काही धडे मिळालेले नव्हते. मामांच्या घरातून आणलेला एक मोडका पॉट दुरुस्त करून घरीच थोडं आइस्क्रीम तयार करायचं आणि ते संध्याकाळी विकायचं असा छोटय़ा स्वरूपातला हा व्यवसाय होता. हळूहळू येणाऱ्या ग्राहकांची पसंती समजू लागली. ग्राहकांची आवड लक्षात आली आणि मग फ्लेवर वाढत गेले. मँगो आइस्क्रीमच्या जोडीला मग सीताफळ, चॉकलेट, गुलकंद, टेंडर कोकोनट, पेरु, चिकू, अंजीर, स्ट्रॉबेरी, बटर स्कॉच, केशर ड्रायफ्रूट असे अनेक फ्लेवर आले. अर्थात हे सगळे प्रकार जसेजसे सुरू झाले त्या त्या वेळी ग्राहकांनीच मोठा आधार दिला. सर्वात मुख्य म्हणजे आइस्क्रीमच्या चवीबद्दल अगदी मोकळेपणानं मत द्यायचं, हे खत्री बंधूंकडे येणाऱ्या ग्राहकांचं ठळक वैशिष्टय़ं आहे. त्यामुळे चव कशी असली पाहिजे, लोकांना नक्की काय आवडतं, हे सहज समजतं असा गिरीश खत्री यांचा अनुभव आहे. मावा आइस्क्रीमची विचारणा लोक नेहमी करायचे. ते बनवून जेव्हा विक्रीसाठी आणलं त्या वेळी ज्या सूचना आल्या, लोकांनी जो सल्ला दिला त्यातूनच ते नवं आइस्क्रीम खत्री तयार करू शकले आणि पुढे तेही लोकप्रिय झालं.

खत्री बंधूंचं आइस्क्रीम जेवढं प्रसिद्ध आहे, तेवढीच मस्तानी देखील प्रसिद्ध आहे. आइस्क्रीमचे जेवढे स्वाद आहेत जवळजवळ तेवढय़ाच प्रकारची मस्तानी देखील खत्रींकडे मिळते. लाकडी आइस्क्रीम पॉटमध्येच खत्री यांच्या घरी आइस्क्रीम तयार केलं जात होतं आणि त्यामुळे त्याचं वेगळेपण सहजच लोकांच्या लक्षात येत होतं. व्यवसाय मोठा झाल्यानंतरही जरी यंत्रसामग्रीची मदत घ्यावी लागली, तरी आइस्क्रीम तयार करण्याची मूळची पद्धतच कायम ठेवण्यात आली आहे. अगदी छोटय़ा स्वरूपात म्हणजे फक्त एक छोटा पॉट एवढंच मँगो आइस्क्रीम तयार करून विकलं जायचं. तेव्हाही ते आइस्क्रीम ‘पॉट आइस्क्रीम’ याच स्वरूपात तयार व्हायचं आणि आजही तीच पद्धत जपण्यात आली आहे. ‘पॉट आइस्क्रीम’चं जे वेगळेपण आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे आइस्क्रीम नक्कीच खायला हवं. आइस्क्रीमसाठी लागणारा कच्चा माल अर्थातच दूध आणि इतर घटक पदार्थ यांचाही दर्जा अतिशय चांगला राखला जातो. त्या सगळ्या प्रक्रियेकडे गिरीश खत्री स्वत: लक्ष देतात. मँगो आइस्क्रीमसाठी लागणारा मँगो पल्प असो किंवा इतर आइस्क्रीमसाठी लागणारा कच्चा माल असो. जो माल त्यासाठी वापराला जातो तो उत्तम प्रतीचाच.

सुरुवातीची काही वर्ष गिरीश खत्री फक्त उन्हाळ्यातच हा व्यवसाय करत होते. हळूहळू व्यवसायाचा विस्तार झाला. लोकांच्या मागणीनुसार मग वर्षभरासाठी आइस्क्रीम विक्री सुरू झाली. पुढे कोथरूडमध्येही एक स्टॉल लागला. तो सुरुवातीला आइस्क्रीम ऑन व्हील अशा स्वरूपाचा होता. पुढे स्टॉल घेण्यात आला. नंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात खत्री बंधू आइस्क्रीम पोहोचलं.

कुठे आहे ?

  • राजाराम पूल ते कर्वेनगर रस्ता, शिवाजी पुतळ्याजवळ- कोथरूड, गंगाभाग्योदय- सिंहगड रस्ता, डेस्टिनेशन सेंटर- नांदेड सिटी, भोसरी आणि बालेवाडी

कधी ?

  • कर्वेनगर आणि कोथरूड येथे सायंकाळी सहा ते रात्री बारा, अन्यत्र दुपारी बारा ते रात्री बारा.

Story img Loader