सामुदायिक हातगाडय़ा; पालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष
शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी छोटय़ा-मोठय़ा खाऊगल्ल्या उभ्या राहिल्या असून महापालिकेचे या खाऊगल्ल्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शहरातील वर्दळीच्या आणि प्रमुख रस्त्यांवर आणि पदपथांवर, सायकलमार्गावर, मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा लावल्या जात आहेत. एकटय़ाने हातगाडी उभी केली, तर पोलीस वा महापालिकेकडून कारवाईची भीती असते. त्यामुळे दहा-पंधरा व्यावसायिक मिळून हातगाडय़ा लावत असून त्यामुळे शहरात अनेक लहान-मोठय़ा खाऊगल्ल्या शहरात उभ्या राहिल्या आहेत.
खाद्यपदार्थाच्या या हातगाडय़ा पदपथांवर तसेच दुचाकी पार्किंगच्या जागांवर लावल्या जात असल्यामुळे दुचाकी रस्त्यांवर लावल्या जातात. परिणामी रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. पालिका निवडणुकांच्या तोंडांवर हातगाडय़ांवर कारवाई होणार का, हा असा प्रश्न उपस्थित होत आहे. दक्षिण दावणगिरी डोसा, भेळ, पाणीपुरी, वडापाव, भजी, अंडाबुर्जी, सरबते, चहा, आइस्क्रीम यांसह अनेक खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा सर्रास रस्त्यांवर दिसतात. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचे तसेच अतिक्रमणविरोधी विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्षच होत आहे. नरवीर तानाजीवाडी, बुधवार पेठ, नेहरू रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, हिराबाग चौक, सारसबाग परिसर, स्वारगेट, रेल्वे स्टेशन अशा प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी हातगाडय़ा उभ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्यभागात भरणा
शहरातील मध्यभागातील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. अनेक रस्त्यांच्या कडेने पदपथच नाहीत. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. त्यातच या भागात मोठय़ा संख्येने खाऊगल्ल्या सुरू होत असल्यामुळे मोठी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे.
सध्या पालिकेतर्फे अन्य अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. सर्व यंत्रणा त्या कामात गुंतलेली असल्याने हातगाडय़ा व अन्य अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही. २१ नोव्हेंबरनंतर हातगाडय़ांवर कारवाई करू.
– संध्या गागरे, अतिक्रमण विभागप्रमुख, पालिका