सध्या सोशल मीडियावर पुणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. संबंधित अधिकारी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई करताना संबंधित अधिकाऱ्याने चक्क लाथ मारून अन्नाचं भांडं पाडलं आहे, या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित कारवाईचा व्हिडीओ शेअर करत मनपा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. माधव जगताप असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान लाथ मारून अन्नाचं भांडं पाडलं आहे.
या घटनेवर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांचं वागणं पाहून सखेद आश्चर्य वाटलं. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.”
संबंधित प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल ढमाले यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून माधव जगताप यांची अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. माधव जगताप यांनी केलेलं कृत्य हे कायदा पायदळी तुडवणारे व माणुसकीला काळीमा फासणारं आहे. महागाईच्या काळात हातावर पोट असणारे नागरिक, बेरोजगार युवकवर्ग, विधवा महिला अशा वर्गाकडून रस्त्यावर हातगाडी लावून काबाडकष्ट करून जगत आहेत. ज्या बाबी अनधिकृत आहेत त्यावर कारवाई केलीच पाहिजे. परंतु असं करताना एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय अशी भूमिका अतिक्रमण विभागाची स्पष्ट दिसते.
माधव जगताप यांनी अतिक्रमण कारवाईदरम्यान लाथ मारून भांडे पाडल्याचं कृत्य मनपाची प्रतिमा मलीन करणारं आहे. त्यामुळे याप्रकरणी माधव जगताप यांच्याकडून लेखी खुलासा मागवावा. तसेत त्यांचा अतिक्रमण विभागाचा पदभार तातडीने काढावा, अशी मागणी ढमाले यांनी पत्राद्वारे केली.