पुणे : धार्मिक कार्यक्रमासाठी कर्नाटकात नेण्याच्या बहाण्याने पुजाऱ्यासह शिष्यांचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बिबवेवाडी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने कर्नाटकातून तिघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रामू अप्पाराय वळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०), हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जरंग तुळशीराम लांडे (५१, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बजरंग लांडे हे पुजारी आहेत. २९ जुलै रोजी त्यांचा मुलगा स्वप्निलला आरोपी घरी येऊन भेटले. त्यांनी विजापुरात हर्षद पाटीलच्या घरी पूजा करायची आहे, तसे मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर लांडे यांना कर्नाटकात पूजेसाठी आमंत्रित केले. लांडे आणि त्यांचे सात शिष्य कर्नाटकात गेले. आरोपींनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पाच कोटींची खंडणी मागितली. लांडे कुटुंबीयांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हेही वाचा – माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

तांत्रिक तपासात आरोपी रायचूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांना यााबाबतची माहिती देण्यात आली. कर्नाटकातून पोलिसांच्या सहकार्याने तिघांना रायचूर परिसरात अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, ज्योतिष काळे, सुमीत ताकपेरे यांनी ही कारवाई केली.