सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला गुंगीचे ओैषध देऊन अपहरण करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत नुकतीच घडली. तरुणीला कल्याण येथे डांबून ठेवण्यात आले होते. तरुणीने स्वत:ची सुटका केली आणि तिने कल्याण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबंधित गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी मूळची साताऱ्यातील आहे. ती पुण्यात सनदी लेखापाल परीक्षेची तयारी करत आहे. सध्या ती शुक्रवार पेठेतील एका वाड्यात पेईंग गेस्ट म्हणून राहायला आहे. एक नोव्हेंबर रोजी तरुणी सदाशिव पेठेतून निघाली होती. त्या वेळी दोन महिला तिला भेटल्या. महिलांनी चेहरा कापडाने झाकून घेतला होता. महिलांनी तिच्याकडे पत्ता विचारण्यााचा बहाणा केला. तिला एक कागद वाचण्यास दिला. त्यानंतर तरुणीला गुंगी आली. तरुणीला चक्कर आल्याचे सांगून तिला रिक्षात बसवले. तिला रुग्णालयात नेत असल्याची बतावणी नागरिकांकडे केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील तरुणीला कल्याण येथे नेले. कल्याण येथील एका अंधाऱ्या खोलीत तरुणीला जाग आली. तिचा मोबाइल संच, आधारकार्ड, रोकड चोरुन नेण्यात आल्याचे लक्षात आले. खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले.
त्यानंतर तरुणी खोलीतून बाहेर पडली. तिने विचारणा केली. तेव्हा ती कल्याणमध्ये असल्याचे समजले. तेथील वाहतूक पोलिसांची मदत घेऊन तिने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. तिचे कुटुंबीय कल्याणमध्ये पोहोचले. त्यानंतर या घटनेची माहिती कल्याण पोलिसांना देण्यात आली. कल्याणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : नवमतदारांना मतदार यादीत आगाऊ नाव नोंदविण्याची संधी; १७ वर्षे पूर्ण होताच करता येणार अर्ज
तरुणीचे अपहरण झाल्यानंतर तिने सुटका करुन घेतली. कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो खडक पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. तरुणी मूळगावी गेली आहे. अपहरण करणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप तरुणीकडे चौकशी करण्यात आली नाही. चौकशीतून काही धागेदोरे मिळतील. – संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे</p>