पुणे: बिबवेवाडीतील वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी वास्तूशास्त्र सल्लागाराच्या खून प्रकरणाचा छडा लावला असून, वास्तूशास्त्र सल्लागाराच्या मित्रासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे. वास्तूशास्त्र सल्लागाराचा खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरुन नीरा नदीत टाकून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>> अमली पदार्थ विक्रीची तक्रार दिल्याने महिलेच्या घरात तोडफोड; मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातील घटना

निलेश दत्तात्रय वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. या प्रकरणी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रुपाली वरघडे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते. आरोपी हे निलेश यांच्या परिचयाचे होते. नऱ्हे भागातील एका ओैषध दुकानात पूजेसाठी नरळे आणि जगदाळे हे निलेश यांना घेऊन गेले होते. निलेश यांना काॅफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरुन नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले.

हेही वाचा >>> पतीच्या प्रेमप्रकरणामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; लोहगाव भागातील घटना; पती अटकेत

निलेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार नरळेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत पोलिसांना तो वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत होता. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी नरळे आणि जगदाळे यांनी खून केल्याची कबुली दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी आढळून आले आहेत. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे आदींनी तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.

हेही वाचा >>> कात्रज भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

नीरा नदीत शोधमोहीम

निलेश यांना दागिने घालण्याची हौस होती. आरोपींनी निलेश यांचा मृतदेह नीरा नदीत टाकून दिल्याचे तपासात उघडकीस आले असून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोटार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाइल संच असा १९ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Story img Loader