लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोंढवा भागात ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याचा सासवड परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचा टोळक्याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोन सराइतांना पोलिसांनी अटक केली.
साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणकर, कापरे सराइत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आणखी वाचा-ऐन पावसाळय़ात उकाडय़ाने हैराण; अकोल्यात सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअसची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहायला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) तो ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न परतल्याने रविवारी त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण बेपत्ता झाला असून, तो कोंढव्यातील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या पायाला जखम झाली होती.
अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनी अपहरण करुन त्याला सासवडला नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.पोलीस निरीक्षक संदीप भोसले तपास करत आहेत.