पुणे: हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने भंगार विक्रेतेच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असून अवघ्या अडीच तासात आरोपींना जेरबंद करण्यात पिंपरी -चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारला यश आले आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, कोयता, तलवार आणि मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेजस ज्ञानोबा लोखंडे,अर्जुन सुरेश राठोड आणि विकास संजय मस्के अशी अटक करण्यात आलेले आरोपींची नावे असून त्यांनी अल्पवयीन १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून तीस लाखांची खंडणी मागितली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात तीन जणांनी झेन गाडीतून अपहरण केले होते. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तपासासाठी रवाना केल्या. याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या काकाला आरोपींनी फोन करून १४ वर्षे अल्पवयीन मुलगा सुखरूप हवा असल्यास आम्हाला ३० लाख रुपये खंडणी द्या अन्यथा तुमच्या मुलाचे बरे वाईट करू अशी धमकी देण्यात आली होती. गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस कर्मचारी प्रशांत सईद यांना आरोपी हे अल्पवयीन मुलाचे अपहरण करून सासवड परिसरात गेले असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा >>>गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक
तिथे पिंपरी- चिंचवड पोलिसांची पथके रवाना झाली. त्या ठिकाणाहून आरोपींना मोठ्या शितापीने ताब्यात घेतलं. आरोपींकडून तीन मोबाईल, कोयते, तलवारी, छाऱ्याची बंदूक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास १४ वर्षी अल्पवयीन मुलगा घराच्या समोर थांबला असता तीन आरोपींनी झेन मध्ये येऊन अपहरण केले होते आणि त्यानंतर अवघ्या अडीच तासांमध्ये अल्पवयीन मुलाची पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.