हडपसर भागातील एका व्यापाऱ्याला धमकावून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. व्यापाऱ्याला मुंबई परिसरात सोडून अपरहणकर्ते पसार झाले असून अपहरणामागचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.
हेही वाचा >>>पुणे: नवमतदारांच्या नोंदणीसाठी आज महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर
हडपसर भागातील मांजरी परिसरात व्यापाऱ्याचे दुकान आहे. व्यापारी मूळचे राजस्थानातील जोधपूरचे आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री ग्राहक म्हणून आलेल्या आरोपींनी रात्री दुकानात व्यापाऱ्याला धमकावले. त्याचे अपहरण करण्यात आले. मोटारीतून त्याला मुंबई परिसरात नेण्यात आले. मुंबईतील वसई नाका परिसरात त्याला सोडून अपहरणकर्ते पसार झाले. त्यानंतर व्यापाऱ्याने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.
हेही वाचा >>>पुणे: करोना महासाथीनंतर रुग्ण चयापचयाच्या समस्यांनी त्रस्त; डॉ. जयश्री तोडकर यांची माहिती
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक विजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, व्यापारी पुण्यात परतला. पोलिसांनी व्यापाऱ्याची चौकशी केली. अपहरणामागचे कारण समजू शकलेले नाही. अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. अपहरणकर्त्यांना पकडल्यानंतर निश्चित कारण समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.